

कोकरुड : गुढे - पाचगणी (ता. शिराळा) येथील पठारावर आलेल्या पर्यटकांची मोटार चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला उलटली. मोटारीने तीन कोलांट्या घेतल्याने मोटारीतील दोन युवक गंभीर जखमी झाले, तर अन्य तीन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिरटे (ता. वाळवा) येथील सोहम डिसले (वय २३) आणि विवेक पाटील (वय २३) हे आपल्या अन्य मित्रांसह बुधवारी गुढे-पाचगणी परिसरात पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पर्यटन उरकून घराकडे परतत असताना, गुढे-पाचगणी रस्त्यावरील पहिल्याच वळणावर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले.
नियंत्रण सुटल्याने गाडीने रस्त्यावर तीन पलट्या मारल्या आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन आदळली. या भीषण अपघातात सोहम डिसले आणि विवेक पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले, तर गाडीतील इतर तीन मित्रांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना तातडीने कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद उशिरापर्यंत कोकरूड पोलिस ठाण्यात झाली नव्हती.