मृणाल वष्ट
सांगली : गतवर्षीपर्यंत चकली भाजणी, चिवडा मसाला, अनारसे पीठ... अशी कमी वेळेत पदार्थ तयार होणारी सामग्री घेऊन दिवाळी साजरी होत होती. यंदा मात्र तयार फराळ खरेदीवर गृहिणींचा भर आहे. शहरात सुमारे ५०० ठिकाणी तयार फराळाची निर्मिती होत असून यानिमित्ताने सुमारे एक हजार महिलांचे हात फराळ निर्मितीत गुंतले आहेत. त्यांच्याकडून दसऱ्यापासूनच कच्चा माल आणून तो निवडून, पीठ करून पूर्वतयारी सुरू आहे.
वेळ व पैशाची सांगड घालण्यासाठी गृहिणींची तयार फराळाला पसंती आहे, तर फराळाचे पदार्थ तयार करणाऱ्यांमध्ये ९९ टक्के महिला उद्योजकच आहेत. त्यामुळे तयार फराळाची निर्मिती महिलांना रोजगार संधी मिळवून देत आहे. विशेष म्हणजे महिलांनी सोशल मीडियाचा आधार घेत आधीच नोंदणी सुरू केली आहे. १ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करून ४ नोव्हेंबरपर्यंत फराळाचे पॅकिंग होणार आहे. ६ रोजी धनत्रयोदशी असल्याने त्यापूर्वी फराळाचे जिन्नस घरपोच देण्याची सुविधाही काही उद्योजकांनी केली आहे.
जसा किराणा मालाचा दर वाढलेला आहे, तसा इतर घटकांचा दरही वाढलेला आहे. मजुरी, पॅकिंगला येणारा खर्च, वाहतूक खर्च यामुळे सगळ्याच घटकात वाढ झाली आहे. मंगल कार्यालये, बचत गटाच्या महिला, घरगुती स्वरूपात आणि बेकरीमध्ये फराळाचे पदार्थ केले जात आहेत. नातेवाईकांना फराळ देण्यासाठी स्वतंत्र कीट तयार करण्यात येत आहेत. मोजकेच चार पदार्थ आणि चार माणसांना पुरतील असे कीट बनवले गेले आहे. परदेशातील मुले, नातेवाईकांसाठीही तयार फराळाचे पॅकेट वीस-पंचवीस दिवस टिकतील या पध्दतीने खास बनवून रवाना केले आहेत.