

Miraj Firing Incident
सांगली: जुन्या वादातून मिरजेतील मंगळवार पेठेत चर्चजवळ गोळीबार करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.१८) दुपारी घडली. यावेळी दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यातून संशयितांनी सलूनची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी संशयितांनी पलायन केले होते. पोलिस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक किरण रास्कर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.
याबाबत माहिती अशी की, मंगळवार पेठेतील चर्चजवळ वैभव यादव याचे सलून दुकान आहे. या दुकानासमोर दोन गट एकमेकांशी भिडले. दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. यातून सलूनचीही तोडफोड करण्यात आली. एकाने रस्त्यावर पिस्तूलमधून गोळी झाडली. गोळीच्या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
गोळीबार झाल्याचे समजताच मिरज शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काडतूस जप्त केले आहे. दोन्ही गटांत आठ दिवसांपासून धुसफुस सुरू होती. याच जुन्या वादातून गोळीबारची घटना घडल्याची चर्चा होती. मिरज शहर पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.