

जत शहर : जत तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना यंदा पावसाच्या लहरीपणामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. सततच्या पावसाने फळ छाटणीला उशीर झाला असून, सप्टेंबरअखेर केवळ 5 टक्के क्षेत्रावरची छाटणी झाली आहे. यामुळे द्राक्ष हंगाम 15 ते 25 दिवस लांबणीवर पडला आहे. निसर्गाच्या संकटांबरोबरच नुकसानभरपाईच्या अभावाने शेतकर्यांची निराशा वाढली आहे.
जत तालुक्यात ऐन फळ छाटणीच्या हंगामातच पावसाचा मुक्काम वाढला. उन्हाळ्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांना यंदाही मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा सप्टेंबरअखेर पाच टक्के क्षेत्रावरदेखील फळ छाटणी झालेली नाही. त्यामुळे यंदा द्राक्ष हंगाम 15 दिवस लांबणीवर पडणार आहे. एकीकडे अस्मानी संकटांची मालिका सुरू असतानाच, दुसरीकडे शासनाकडूनदेखील मदतीच्या बाबतीत भ्रमनिरास झाला. शासनाने द्राक्ष बागायतदारांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
जत तालुक्यात तब्बल 10 ते 12 हजार एकर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. मागील चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. द्राक्ष उत्पादकांना खरड छाटणीनंतर मोठी कसरत करावी लागली. यंदा 14 मेपासूनच पाऊस सुरू झाला. त्यामुळे द्राक्षबागांची काडी तयार करण्यासाठी सरासरीच्या दुप्पट खर्च करावा लागला.
तालुक्यात सुमारे 10 हजार एकरावर सप्टेंबर महिन्यातच फळ छाटणी घेतली जाते. आगाप फळ छाटणी घेतल्यास द्राक्षाला चांगला दर मिळतो. मात्र, यंदा पावसाच्या लहरीपणामुळे आजअखेर 100 एकर क्षेत्रावरदेखील फळ छाटणी झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष हंगाम 15 दिवस लांबणीवर पडला आहे.