

सांगली ः स्थानिक बाजारपेठेत कमी दर मिळत असल्याने गुणवत्तेची द्राक्षे निर्यात करून जास्त उत्पन्न मिळवण्याकडे जिल्ह्यातील शेतकर्यांचा कल वाढत आहे. आतापर्यंत दहा हजारावर शेतकर्यांची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. नोंद करण्यासाठी आणखी पंधरा दिवसाची मुदत दिली आहे.
यंदा निर्यातदार शेतकरी सर्वाधिक आहेत. पाच वर्षांत निर्यातदार शेतकर्यांची संख्या चारपटीने वाढली आहे. राज्यातून प्रत्येकवर्षी द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यातून देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळते. त्यात सांगली जिल्ह्याचा वाटा मोठा आहे. जिल्ह्याचे द्राक्षाचे क्षेत्र 1 लाख 30 हजार एकरांवर आहे. निर्यातक्षम द्राक्षबागेची ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत असते. मात्र कृषी विभागाने यंदा ही मुदत पंधरा दिवसांनी वाढवली. गेल्यावर्षी द्राक्ष निर्यातीसाठी 9 हजार 524 शेतकर्यांनी नोंदणी केली होती. त्याद्वारे 5 हजार 313 हेक्टरवरील द्राक्षे सातासमुद्रापार पोहोचली. नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे मात्र द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय यंदाही अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकर्यांना बसला. त्यामुळे द्राक्षबागांत घडांचे प्रमाण कमी झाले. परिणामी चांगल्या गुणवत्तेची द्राक्षे मिळतील.
राज्यातून बांगलादेश, आखाती देशांत नोव्हेंबर-डिसेंबरपासून द्राक्षांची निर्यात सुरू होते. त्यानंतर जानेवारीपासून युरोपियन देशांत द्राक्षनिर्यात होण्यास प्रारंभ होतो. गेल्यावर्षी युरोपीय देशांत 828 कंटेनरमधून 9 हजार 702 टन, तर इतर देशांत 489 कंटेनरमधून 7 हजार 616 टन द्राक्षे निर्यात झाली होती.
युरोपीय देशांत द्राक्षे निर्यात करण्यासाठी कडक नियम आहेत. रासायनिक औषधांचा मारा केलेली द्राक्षे नाकारली जातात. द्राक्षमण्याचा रंग, आकार, साखरेचे प्रमाण पाहून घातक रसायनमुक्त रेसिड्यू फ्री द्राक्षे पाठवण्यात येतात.
युरोप आणि अमेरिकेत समुद्रमार्गे द्राक्ष निर्यात केली जाते. गेल्या वर्षी आखाती देशातील युद्धाचा परिणाम वाहतुकीवर झाला, आफ्रिकामार्गे द्राक्षनिर्यात करावी लागली. लाल समुद्रामार्गे अठरा ते वीस दिवसांत युरोपात द्राक्षे पोहोचत असत. त्या वाहतुकीसाठी एका कंटेनरसाठी 1800 डॉलर भाडे लागत होते. ती वाहतूक बंद झाल्यामुळे आफ्रिकामार्गे वाहतूक करावी लागली. त्यामुळे एका कंटेनरचे भाडे तब्बल सहा हजार डॉलर्सवर पोहोचले.
द्राक्षाचे एकरी सरासरी बारा टन उत्पादन निघते. मात्र यंदा प्रतिकुल हवामानामुळे एकरी पाच ते सहा टन उत्पादन आहे. सध्या आखाती देशांत द्राक्षे जात असून किलोला सरासरी दर 110 रुपये आहे. दर चांगला असला तरी उतारा कमी असल्याने शेतकर्यांसमोर अडचणी कायम आहेत.
जिल्ह्यातून युरोपीय देशांत द्राक्षाची निर्यात वाढावी, निर्यातदार शेतकरी वाढावेत, यासाठी कृषी विभागाने यंदा प्रयत्न केले. त्यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळांचे आयोजन केले. त्यामुळे निर्यातदार शेतकर्यांची संख्या वाढली, असे कृषी विभागातील अधिकारी पी. एस. नागरगोजे यांनी सांगितले.