

सांगली : गेल्या वर्षी सततच्या पावसाचा मोठा फटका द्राक्षाला बसला. अनेक बागायतदारांच्या द्राक्षबागांचे नुकसान झाले. मणीगळ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे यंदा द्राक्षांची निर्यात सुमारे एक हजार मेट्रिक टनाने घटली. निर्यात जरी घटली असली तरीसुद्धा, द्राक्ष दरात यंदा वाढ झाली. त्यामुळे देशाला परकीय चलन चांगले मिळाले. यंदा द्राक्ष निर्यातदार शेतकरी आणि निर्यातीच्या क्षेत्रातही वाढ झाली.
इतर सर्व पिकांच्या तुलनेत द्राक्षे नाजूक पीक मानले जाते. त्यामुळे रोगाला बळी पडू नये यासाठी शेतकर्यांना या पिकाची खूप काळजी घ्यावी लागते. यंदा लहरी हवामान असूनही त्यावर शेतकर्यांनी मात करत गुणवत्तेची द्राक्षे तयार केली. यंदा स्थानिक बाजारपेठेतही द्राक्षाला चांगला दर मिळाला. मोठ्या प्रमाणात द्राक्ष विक्री झाल्यामुळे बेदाणा निर्मितीही कमी प्रमाणात झाली. गेल्यावर्षी 9 हजार 629 शेतकर्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली होती. त्यातून 19 हजार 270 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली. उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने अपेक्षित दर मिळाला नाही. यंदा 10 हजार 156 शेतकर्यांनी निर्यातीसाठी नोंद केली होती. त्यातून 18 हजार 204 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली.
द्राक्षाचे एकरी सरासरी उत्पादन 10 ते 14 टनांपर्यंत शेतकरी घेतात. यंदा द्राक्ष पिकाच्या फळ छाटणीपासून विविध वाढीच्या टप्प्यात निसर्गाची अवकृपा झाल्याने बागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदा शेतकर्यांना एकरी आठ ते दहा टनच उत्पादन निघाले. काही शेतकर्यांच्या द्राक्ष बागा फेल गेल्या. त्यामुळे उत्पादनात घट झाली. ज्या शेतकर्यांकडे द्राक्षे होती, त्यांना चांगले पैसे मिळाले; मात्र ज्यांच्या बागा गेल्या, त्यांना मोठा फटका बसला.
निसर्गाच्या अडथळ्यांमुळे यंदा शेतकर्यांना द्राक्ष छाटणीचे वेळापत्रक बदलावे लागले. शेतकर्यांच्या मागणीमुळे नोंदणीसाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. यामुळे द्राक्षे निर्यातक्षम शेतकर्यांची संख्या वाढली.
यंदा राज्यातून द्राक्षे निर्यातीसाठी 41,821 शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. ती मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील दहा हजार 165 शेतकर्यांचा समावेश होता. जिल्ह्यात दहा वर्षांत द्राक्षे निर्यात शेतीचे क्षेत्र व द्राक्षांची निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे चांगले परकीय चलन मिळाले.
बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने द्राक्षांचे दर चांगले राहिले. गेल्या वर्षी स्थानिक बाजारपेठेत 30 ते 50 रुपये किलो असलेली द्राक्षे, यंदा 70 ते 120 रुपये प्रति किलो होती. निर्यातीच्या द्राक्षांनाही सरासरी शंभर रुपयांहून अधिक दर मिळाला. गेल्यावर्षी तो सरासरी 70 रुपयांच्या आसपास होता.