

तांदूळवाडी : जलजीवन योजनेच्या कामांची बिले वेळेवर मिळत नसल्याने कर्ज वाढत गेले... बँका, सावकार, देणेकरी पैशासाठी तगादा लावू लागले... लोक दारात येऊ लागले... यामुळे दहा-बारा वर्षांत बांधकाम व्यवसायात मिळवलेल्या नावाला गालबोट लागू लागले. हीच गोष्ट हर्षल यांच्या मनाला लागली! त्याच नैराश्यातून त्यांनी जीवन यात्रा संपवल्याची चर्चा तांदूळवाडी आणि परिसरात आहे. त्यांनी जलजीवन मिशनची साडेनऊ कोटींची कामे पूर्ण केली. त्यापैकी त्यांचे अडीच कोटींचे बिल थकीत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यामुळे मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे हर्षल मित्रांजवळ वारंवार बोलत होते. अखेर त्यांनी बुधवारी पत्नी जयश्री, पाच वर्षाची मुलगी यशवी, आई -वडील, दोन भाऊ यांची साथ सोडत टोकाचा निर्णय घेतला आणि जीवन संपवले. या घटनेमुळे सांगली जिल्हाच नव्हे, तर राज्यभर खळबळ माजली.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हर्षल यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दहा-बारा वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात ते खासगी इमारतींच्या बांधकामाची कामे घेत होते. बांधकाम व्यवसायात चांगले नाव झाल्यानंतर ते शासकीय कामे घेऊ लागले. व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांनी जलजीवन योजनांची कामे करण्यास सुरुवात केली.
जलजीवन योजनेच्या मुख्य ठेकेदारांकडून हर्षल यांनी तालुक्यातील काही गावातील योजनांची कामे घेतली होती. तांदूळवाडी, मालेवाडी, कणेगाव या गावातील जलजीवन योजनेचे काम त्यांनीच पूर्ण केले आहे. या योजनांच्या कामासाठी त्यांनी अनेक बँका, खासगी सावकार यांच्याकडून कर्ज घेतले होते. तसेच काही नातेवाईकांकडूनही उसने पैसे घेतले होते. हा आकडा कोटीच्या घरात आहे. शासनाने पूर्ण झालेल्या कामांची बिले वेळेवर न काढल्याने त्याचे देणे वाढतच गेले. उसने घेतलेले पैसे वेळेवर परत देता येत नसल्याने हर्षल गेल्या काही दिवसांपासून निराश होते.
हर्षल पाटील हे सब कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगत शासकीय यंत्रणेने देय रकमेबाबत हात वर केले आहेत. हर्षल यांचे शासन काहीच बिल देणे नाही, असे सांगितले जात आहे. मात्र हर्षल यांनी ज्या ठेकेदारांकडून कामे घेतली होती, त्या सर्व ठेकेदारांचे पूर्ण झालेल्या कामांचे सुमारे 19 कोटी रुपये शासनाकडून येणे आहेत, असे समजते. दरम्यान, गुरुवारी माजी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील यांच्यासह अनेकांनी हर्षल पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
हर्षल यांनी काही खासगी सावकारांकडून दहा टक्के व्याजाने पैसे उचलल्याचीही चर्चा आहे. व्याज व मुद्दल यापोटी त्यांना महिन्याला अडीच ते तीन लाख रुपये द्यावे लागत होते. शासकीय बिले वेळेत मिळत नसल्याने ही रक्कम देताना त्यांना आणखी पैशांची उचल करावी लागत होती. बँकांचे लोक तसेच सावकार वसुलीसाठी घराकडे येऊ लागले. यामुळे आजपर्यंत समाजात मिळविलेल्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का बसत आहे, ही बाब हर्षल यांच्या मनाला लागली. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याची चर्चा गावात होती.