

विटा : भाजपच्या कार्यकर्त्याला कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने राजकीय दबावाखाली त्रास दिला, तर त्याची गाठ गोपीचंद पडळकरांशी आहे, हे लक्षात ठेवावं, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटात भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी अध्यक्ष म्हणून गोपीचंद पडळकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष वैभव पाटील तसेच दाजीभाऊ पवार, विलास काळेबाग, शुभांगी सुर्वे, अंबिका हजारे आदी उपस्थित होते. आमदार पडळकर म्हणाले, राज्यातील 29 पैकी 26 महापालिका आपण जिंकल्यात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही असेच चित्र राहणार आहे. खानापूर तालुक्यात भाजपला मोठी संधी आहे. निधीची काळजी तुम्ही करू नका. आमदारांचा जेवढा निधी असेल, तेवढा निधी आपण मिळवून देऊ. सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवायचा आहे, हे लक्षात ठेवून कामाला लागा.
वैभव पाटील म्हणाले, विद्यमान आमदारांनी खानापूर आणि आटपाडी याठिकाणी मिनी एमआयडीसी आणतो, असा शब्द दिला होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते विसरले. कारण सव्वा वर्ष झालं तरी त्यावर अजून काहीही झालेले नाही. जतमध्ये आमदार पडळकरांनी आरटीओ ऑफिस आणले. गेल्या सव्वा वर्षात आपल्या आमदारांनी केले काय?. विधानसभा झाली आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना एकट पाडणार नाही. न खचता चांगल्या पद्धतीने आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे.