

जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत तालुक्यात अ वर्ग सोसायटीच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) उमेदवार विनोद पवार आणि समर्थकांनी केला आहे.
जत सोसायटी गटातील लढतीत विनोद पवार, तर भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात थेट सामना होत आहे. विनोद पवार हे भाजपचेच जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांचे बंधू आहेत. सोनलगी गावातील ठरावधारक श्रीशैल संगाप्पा कळ्ळी यांचे अपहरण केल्याच्या खोट्या तक्रारी जबरदस्तीने केल्या जात असल्याचे म्हणणे विनोद पवार यांनी मांडले आहे. ठरावधारकाचे अपहरण झाले नसताना अपहरण झाल्याची खोटी नोंद पोलिस ठाण्यात केल्याचे पवार सांगतात.
श्रीशैल कळ्ळी यांच्या आईला जबरदस्तीने उमदी पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार करण्यास भाग पाडले. त्या निरक्षर असून, त्यांच्यावर दबाव आणून मुलाचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार माजी आमदार विक्रम सावंत, नाना शिंदे आणि विक्रम पवार यांच्यावर करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.
लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष
जत तालुक्यातील सोसायटी गटातील या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, ८८ मतदारांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विनोद पवार म्हणतात...
उमदी पोलिस ठाण्यात श्रीशैल कळ्ळी यांचे मी अपहरण केल्याचा गुन्हा राजकीय दबावापोटी दाखल झाला आहे. ते माझे मित्र आहेत, ते हैदराबादला पर्यटनासाठी आले आहेत. उमदी पोलिस हैदराबाद येथे आले होते. सर्वांचे जबाब घेऊन ते हैदराबादहून निघून गेले, मात्र अशा पद्धतीने पोलिस प्रशासनाचे वर्तन अयोग्य वाटते. राजकीय दबावाला बळी पडून पोलिस प्रशासनाने धमकावणे चुकीचे आहे. हे वर्तन बेकायदेशीर आहे. तक्रारदारास लिहिता-वाचताही येत नाही, त्यांना मराठीच येत नाही. तरीही त्यांचा अंगठा उमटवून खोटी तक्रार दाखल केली आहे.
माझे कोणीही अपहरण केलेले नाही : कळ्ळी
आंध्र प्रदेशातील अबिद रोड पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार अपहरणाची कोणतीही घटना घडलेलीच नाही. पोलिसांनी श्रीशैल कळ्ळी यांच्यासह या पोलिस ठाण्याबाहेर व्हिडीओ करून तो प्रसारित केला आहे. पोलिस ठाण्याबाहेरच केलेल्या या व्हिडीओत श्रीशैल कळ्ळी म्हणतात की, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. माझी कोणाविरोधातही तक्रार नाही. माझे कोणीही अपहरण केलेले नाही. माझ्या वैयक्तिक कामानिमित्त मी परगावी आलो आहे. कोणाचे तरी ऐकून माझ्या अपहरणाची तक्रार दाखल करून घेऊ नये.