

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात वेगाने वाढ होत आहे. यामध्ये मंगळवारी विक्रमी वाढ झाली. सोन्याच्या दरात सहा हजार तर चांदीच्या दरात तब्बल 18 हजार रुपयांनी वाढ झाली. काल सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 1 लाख 30 हजार रुपयावर तर चांदीचा दर प्रति किलो 1 लाख 90 हजारावर पोहोचला. गेल्या तीन महिन्याची तुलना केल्यास सोन्याच्या दरात तब्बल 25 टक्के तर चांदीच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले असताना ग्राहकांचा मात्र चांगला प्रतिसाद आहे.
सांगलीच्या सुवर्ण बाजारपेठेत दुपारनंतर सोन्याचा दर 1 लाख 30 हजार रुपयावर पोहोचूनही ग्राहकांमध्ये उत्साह दिसून आला. सोन्याच्या दरात भरमसाट वाढ झाली असताना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हीच परिस्थिती चांदीची राहिली. सकाळपासून सोन्या-चांदीच्या खरेदीला शहरातील सराफ दुकानांत गर्दी होती.
काल सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम (तोळा) 1 लाख 24 हजार 800 रुपये तर चांदी प्रति किलो 1 लाख 65 हजार 500 रुपये होती. सोन्यामध्ये सुमारे सहा हजार, तर चांदीमध्ये अठरा हजार रुपयांनी वाढ झाली.