

सांगली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यासाठी सांगलीची सराफ बाजारपेठ सज्ज झाली असतानाच, सोने आणि चांदीच्या दराचा नवा विक्रम झाला आहे. शनिवारी सोन्याचा दर जीएसटीसह 92 हजार 700 रुपये दहा ग्रॅम, तर चांदीचा दर 1 लाख 6 हजार 810 रुपये किलो झाला आहे. दोन महिन्यांत सोन्याच्या दरात दहा हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
सांगलीची सुवर्ण बाजारपेठ सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाठी विश्वासार्ह मानली जाते. या बाजारपेठेला दीडशे वर्षांहून अधिक परंपरा आहे. यामुळे सांगली जिल्ह्याबरोबरच विजापूर, बेळगाव या कर्नाटकातील जिल्ह्यांतील नागरिक सोने, चांदीच्या खरेदीसाठी येत असतात. गुढीपाडव्यानिमित्त सांगलीच्या बाजारपेठेत दहा ते बारा कोटींची उलाढाल होत असते. लग्नसराईच्या अनुषंगाने तयार दागिन्यांसह वेढण, नाणी, तसेच बिस्किटांमध्ये चांगली उलाढाल होण्याची अपेक्षा सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिक आवर्जून सोने खरेदी करतात. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित तसेच चांगला परतावा देणारी मानली जात असल्याने, दर वाढले तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करीत असतात. यंदाही ग्राहक मुहूर्त साधतील, अशी अपेक्षा सराफ व्यावसायिक व संघटनेचे सचिव पंढरीनाथ माने यांनी व्यक्त केली.
गुढीपाडव्याची तयारी सुरू असतानाच शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली. सोन्याचा दर 92 हजार 700 रुपये तोळा, तर चांदीचा दर 1 लाख 6 हजार 810 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. सोन्याच्या दरात एका दिवसात पाचशे रुपयांची, तर चांदीच्या दरात हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात दोन वर्षांत तब्बल 37 टक्के वाढ झाली आहे. दोन महिन्यांत दहा हजार रुपयांनी दर वाढला आहे. डॉलर वधारल्याने हा परिणाम झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.