तरुणांच्या हाताला काम द्या, गुन्हेगारी थांबेल : आमदार अरुण लाड
पलूस : राज्य सरकारने लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करून तरुणांच्या हाताला काम द्यावे, जेणेकरून समाजात स्थैर्य निर्माण होईल व गुन्हेगारीचे प्रमाणही घटेल, असे प्रतिपादन आ. अरुण लाड यांनी केले.
राज्यातील वाढती बेरोजगारी हे तरुणाईच्या दिशाहीनतेचं मूळ कारण असून, शिक्षण घेतलेला युवक आज रस्त्यावर आहे. भरती प्रक्रिया रखडल्यामुळे हजारो पदे रिक्तआहेत. परिणामी, तरुण गुन्हेगारीकडे वळत असून कायदा-सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे, अशी खरमरीत टीका आमदार अरुण लाड यांनी विधानपरिषदेत केली.
राज्य शासनाने मेगा भरतीची घोषणा करून तब्बल एक वर्ष उलटले, तरी एकही ठोस पाऊल उचललेलं नाही. उलट विविध विभागातील कर्मचारी संख्या दिवसेंदिवस घटत आहे. कृषी विभागात 10 हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषी पदवीच्या 27 टक्के जागा भरल्या जात नाहीत. सांगली जिल्ह्यातील 300 शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 6830 पदे मंजूर असून तीसुद्धा कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. 45 टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. राज्यभरात शिक्षकांच्या 12 हजार जागा रिक्तआहेत. तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकार्यांसह अनेक पदांवरील भरती न्यायप्रवीष्ट असल्यामुळे परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची अवस्था अंधारात असल्याचे लाड यांनी नमूद केले. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी नैराश्येच्या गर्तेत सापडले असून काहीजण व्यसनाधीन होत आहेत. पुण्यासारख्या शहरात कोयता गँगसारख्या टोळ्यांचे वाढते अस्तित्व हे याचेच ज्वलंत उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

