Sangli : मुलांवर लादू नका आपल्या अपेक्षांचं ओझं

सक्ती नकोच ः नेलकरंजी घटनेतून घ्यावा धडा
Sangli News
नीट सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलीला मारहाण केली आणि यात तिचा मृत्यू झाला.
Published on
Updated on
प्रशांत भंडारे

आटपाडी ः एका शिक्षक पित्याने केवळ नीट सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलीला मारहाण केली आणि यात तिचा मृत्यू झाला. ही केवळ एका घराची शोकांतिका नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि पालकत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह आहे. नेलकरंजी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे नुकत्याच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने समाजमन हळहळले.

स्पर्धा की संघर्ष?

विद्यार्थ्याचे स्वप्न, श्रम आणि वेळ एका परीक्षेवर लावलेले असतात. पण प्रत्येकजण डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस होईलच असे नाही. त्यात अपयश आल्यावर अनेकजण मानसिक तणावात जातात. काहीवेळा तो तणाव इतका तीव्र होतो की आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जातो. 2023 मध्येच भारतात 13 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी सांगते.

शिक्षणावरचा खर्च ; ओझं की गुंतवणूक?

शहरांपासून गावांपर्यंत सर्वत्र शैक्षणिक खर्च वारेमाप वाढलेला आहे. ऐपत नसतानाही शिक्षणासाठी पालक शेती गहाण टाकतात, कर्ज घेतात, नातेवाईकांकडून मदत मागतात. या सर्व गुंतवणुकीत एक गोष्ट दुर्लक्षित राहते ती म्हणजे पाल्याची क्षमता, आवड आणि मानसिक आरोग्य.

‘बेडकाचा बैल’ होऊ शकत नाही

सर्वांना एकाच साच्यात ओतण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. डॉक्टर, इंजिनिअर किंवा सरकारी अधिकारी झाल्याशिवाय आयुष्याला काहीच अर्थ नाही, अशी चुकीची धारणा वाढीस लागलेली आहे. प्रत्येक पाल्याची एक स्वतंत्र ओळख आहे. आवड आहे. कला, क्रीडा, कृषी, उद्योजकता, सेवा क्षेत्र या सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज असली तरी फक्त गुणच निर्णायक ठरत नाहीत.

पालकत्वाची नवी व्याख्या

पालकत्व म्हणजे केवळ भविष्याची ‘सुरक्षित गुंतवणूक’ नाही, तर ती एक जबाबदारी आहे - समजून घेण्याची, समजावून सांगण्याची आणि साथ देण्याची. ‘मुलं आपली नाहीत, ते जीवनाच्या ओढीने आलेले अतिथी आहेत’, हे खलिल जिब्रान यांचे शब्द आजच्या काळात खरे उतरतात.

यशाची जबरदस्ती नको...

विद्यार्थी ही एक व्यक्ती आहे, यंत्र नव्हे. त्याच्यावर यशाची जबरदस्ती टाकणं म्हणजे त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं. आपण जर अपेक्षांची पातळी त्यांच्या क्षमतेनुसार ठेवली, तर अपयश ही फक्त एक पायरी वाटेल, आत्महत्या नव्हे. मुलांना उडू द्या त्यांच्या आकाशात, पालक म्हणून आपण फक्त वार्‍याची दिशा दाखवा.

उपाय काय?

  • पालकत्व प्रशिक्षण : प्रत्येक पालकाला मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांना दिशा देणे आवश्यक आहे.

  • शाळांत समुपदेशन सक्तीचे करणे. प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये मानसिक आरोग्य आणि करिअर मार्गदर्शन केंद्र असावं.

  • गुणांपेक्षा जीवन महत्त्वाचं ः ही मानसिकता शाळा आणि समाजात रुजवणे.

  • स्पर्धा नव्हे, समजूत ः यश हे केवळ एका परीक्षेवर अवलंबून नसते.

  • यशाचे नवे मापदंड ः ज्या व्यक्तीला आपल्या कामात समाधान आहे, ती खरी यशस्वी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news