

कुंडल : कुंडल (ता. पलूस) येथील ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर विरुद्ध गौरव मछवारा (पंजाब) यांच्या लढतीत गौरव मछवारा याने 11 व्या मिनिटाला हर्षल सदगीर याला हफ्ता डावावर चितपट केले. रविवारी आयोजित कुस्ती मैदानात अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या निकाली लढतीने कुस्तीशौकिनांनी एकच जल्लोष केला.
सुरुवातीला अन्य गटातील कुस्त्या झाल्यानंतर रात्री उशिरा प्रमुख लढतींना सुरुवात झाली. पहिल्या क्रमांकासाठी हर्षल सदगीर विरुद्ध गौरव मछवारा यांच्यात लढत झाली. दुसर्या मिनिटाला हर्षलने पट घेत गौरवला खाली खेचले, पण त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दोन्ही मल्ल पट काढण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर 11 व्या मिनिटाला गौरवने हर्षलला हफ्ता डावावर चितपट करीत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. माऊली जमदाडे विरुद्ध प्रिन्स कोहली यांच्या लढतीत प्रिन्स कोहलीने चौथ्या मिनिटाला माऊलीवर घिस्सा डावावर विजय मिळवला. महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर यांच्या लढतीत महेंद्र गायकवाडने पुट्टी डावावर दहाव्या मिनिटाला प्रकाश बनकर याला चितपट केले. दादा शेळके विरुद्ध लल्लू जम्मू यांच्यातील कुस्ती 30 मिनिटांनी गुणावर लावण्यात आली. यानंतर दादा शेळके आक्रमक होत दुसर्या मिनिटाला गुणांवर विजय मिळवला.
रविराज चव्हाण विरुद्ध अभिनव नायक यांची कुस्ती प्रेक्षणीय झाली. प्रथम अभिनवने छडीटांग करत कुस्तीत रंगत आणली. हा डाव पलटवत रविराज चव्हाणने चौथ्या मिनिटाला एकेरी कसावर कुस्ती जिंकत कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सनी मदने विरुद्ध नवीन कुमार यांच्या लढतीत सनी मदने घुटना डावावर विजयी झाला. ओंकार मदने विरुद्ध विनायक वाल्हेकर यांच्या कुस्तीत ओंकारने डंकी डावावर तिसर्या मिनिटाला विजय मिळवला. सतपाल शिंदे विरुद्ध अनिल बामणे यांच्या लढतीत सतपाल शिंदे तिसर्या मिनिटाला हफ्ता डावावर विजयी झाला.
वैभव माने विरुद्ध महारुद्र काळेल, कार्तिक काटे विरुद्ध संदीप मोटे, भारत पवार विरुद्ध निकेतन पाटील या लढती बरोबरीत सोडवण्यात आल्या. कालीचरण सोलनकर विरुद्ध धीरज पवार यांची कुस्ती धीरज पवार जखमी झाल्याने बरोबरीत सोडवण्यात आली. गौरव हजारे, अभिषेक घारगे, पृथ्वीराज पाटील यांनीही चटकदार कुस्त्या केल्या. जोतिराम वाजे यांनी समालोचन केले. संतोष वेताळ, सुनील मोहिते यांनी पंच म्हणून काम पाहिले. मैदानास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.
एक हात नसणारा पैलवान
एक हात नसणारा पैलवान विराज पाटील विरुद्ध प्रज्योत पटेल यांच्यात चटकदार कुस्ती झाली. यामध्ये दिव्यांग विराज पाटील याने प्रज्योतवर अवघ्या चौथ्या मिनिटाला घिस्सा डावावर विजय मिळवला.
महिला कुस्त्यांमध्ये चुरस
महिला गटात नेहा शर्मा विरुद्ध धनश्री फंड यांच्या लढतीत सुरुवातीला नेहाने मोळी बांधण्याचा प्रयत्न केला, पण आठ मिनिटांच्या खडाखडीनंतर ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. मुस्कान रोहतक विरुद्ध पूजा लोंढे यांच्या लढतीत मुस्कानने एकेरी कसावर अवघ्या दुसर्या मिनिटाला विजय मिळविला. वेदांतिका पवार विरुद्ध दिशा मलिक यांची लढत बरोबरीत सोडवण्यात आली. वैष्णवी पवार विरुद्ध रिया भोसले यांच्या लढतीत रियाने पोकळ घिस्सा डावावर वैष्णवीवर विजय मिळवला.