

म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथील शेडबाळ रस्ता, मळाभाग परिसरात गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट होऊन तिघे गंभीर जखमी झाले. या भीषण स्फोटात घराचे पत्र्याचे छत उडाले. बाजूच्या भिंती कोसळल्या. ही घटना सोमवार, दि. 5 मे रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. सिलिंडरमधून रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
स्फोटामध्ये सूर्यकांत वनमोरे (वय 44), मयुरी वनमोरे (36), प्रिया वनमोरे (13, सर्व रा. म्हैसाळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. म्हैसाळ येथील शेडबाळ रस्त्यावरील मळ्यात वनमोरे कुटुंब राहते. सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे सूर्यकांत वनमोरे हे अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी गॅस सुरू करीत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. घटनेतील सर्व जखमींना मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी म्हैसाळ दूरक्षेत्र पोलिस चौकीचे बीट अंमलदार बळीराम पवार उपस्थित होते.
स्फोट इतका भीषण होता की घरावरील पत्रे उडून गेले. घरातील फर्निचर, कपाट, फॅन व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. स्फोटाच्या प्रचंड आवाजामुळे जवळपासच्या घरातील भांडी व इतर साहित्य खाली पडले.