

Sangli Ganja Cultivation
विटा : घराच्या शेजारी चक्क गांजाच्या झाडांची लागवड केल्याप्रकरणी नागेवाडी (ता.खानापूर) येथील एकास अटक केली. राजू श्रीरंग मदने (वय ३३) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून एकूण ९ किलो ८०८ किलो वजनाची ९८ हजार ८० रुपये किंमतीची २३ गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार आणि गुन्हे प्रकटीकरण पथकास अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विक्री, साठा, उत्पादनबाबत माहिती काढा आणि थेट कारवाई करा, अशा सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे नागेवाडी गावाच्या परिसरात विटा पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना पोलीस हवालदार अशोक रणदिवे यांना त्या गावातील राजू मदने या व्यक्तीने घराशेजारीच गांजा लावला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हवालदार रणदिवे यांनी पोलीस पथकातील उपनिरीक्षक अभिजीत कणसे, हवालदार अमोल पाटील, उत्तम माळी, अमोल कराळे, विलास मोहिते, किरण पाटील, हेमंत तांबेवाघ, महेश देशमुख, संभाजी सोनवणे यांनी पाहणी केली असता गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. ही सर्व झाडे जप्त करुन संशयित राजू मदने यालाही अटक कर ण्यात आली आहे.