

सांगली ः जिल्ह्यात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस बुधवारपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी संकेतस्थळ सातत्याने ठप्प होत होते. तसेच लॉगिन न होणे, सर्व्हर डाऊन होणे, अशा तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे विद्यार्थी, पालक वैतागले होते. शिक्षण विभागाने यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
केंद्रीय पद्धतीने राज्यात यंदा पहिल्यांदाच अकरावीचे प्रवेश ऑनलाईन अर्ज भरून घेऊन होत आहेत. त्यासाठी राज्यात एकच संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ तांत्रिक कारणांमुळे कोलमडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. ऑनलाइन अर्ज करण्यास 28 तारखेपर्यंत मुदत आहे. प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातीळ 242 उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अकरावीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र राज्यभरात एकाच पोर्टलवर नोंदणी सुरू असल्याने सर्व्हर डाऊन होणे, विद्यार्थ्यांना लॉगिन न होणे, अशा अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. याबाबत ठोस माहितीही मिळत नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.