

लिंगनूर : मिरज तालुक्यातील विविध शाळांची विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी वाटप करावयाची पुस्तके केंद्र शाळेकडे रवाना झाली आहेत. खटाव आरगसह मिरजपूर्व भागातील सर्व शाळांची पुस्तके केंद्र शाळेकडे पोहोचविण्यात आली. विद्यार्थी संख्येनुसार शाळानिहाय व इयत्तानिहाय पुस्तकांची विभागणी करून पुस्तके नेण्यासाठी केंद्रातील सर्व जिल्हा परिषद व खासगी हायस्कूलमधील शिक्षक व मुख्याध्यापक मिरज येथे आले होते.
पंचायत समिती मिरज व शिक्षण विभाग समग्र शिक्षामार्फत सन 2025 -26 चे नव्या शैक्षणिक वर्षाचे पुस्तक वाटप मिरज हायस्कूल येथे सुरू आहे. दि. 3 ते 11 जूनअखेर मिरज तालुक्यातील चौदा केंद्रातील खटाव, आरग, नांद्रे, कवलापूर, एरंडोली, खंडेराजुरी, सोनी, माधवनगर, कुपवाड, कसबेडिग्रज, कवठेपिरान, म्हैसाळ, बेडग व मालगाव असे केंद्रनिहाय व वेळापत्रकनिहाय वाटप होणार आहे. मिरज तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या 29 हजार 666 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचे नियोजन केले आहे.
मराठी माध्यमात इयत्ता पहिली 3369, इयत्ता दुसरी 3369, तिसरी 3369, इयत्ता चौथी 3832, इयत्ता पाचवी 4216, इयत्ता सहावी 3602, इयत्ता सातवी 3840, इयत्ता आठवी 4069, असे पाठ्यपुस्तक संच प्राप्त झाले आहेत. त्यांचे वाटप सुरू झाले आहे. उर्दू माध्यमात इयत्ता पहिलीचे 74, दुसरी 74 , तिसरी 74, चौथी 96, पाचवी 91, सहावी 74, सातवी 60, आठवी 10 असे संच प्राप्त झाले आहेत. सेमी इंग्रजी माध्यमात इयत्ता पहिली 425, दुसरी 425, तिसरी 325, चौथी 325, पाचवी 1450, सहावी 1280, सातवी 1225, आठवी 1340 असे संच प्राप्त झाले आहेत.
इयत्ता पहिलीसाठी नव्या सीबीएससी पॅटर्नप्रमाणे पुस्तके प्राप्त झाली आहेत. इयत्ता दुसरी ते आठवीसाठी विषयनिहाय पुस्तके प्राप्त झाली आहेत. प्रभारी गटशिक्षणाधिकारी जहांगीर बागवान, पाठ्यपुस्तक विभाग प्रमुख संजय यादव, समग्र शिक्षा अभियानाचे सर्व कर्मचारी, अर्चना साळुंखे, शीतल सुतार, लक्ष्मण शिंदे, रुपाली चोथे, सोनाली कुंभार, संजय निकम, विद्या शिंदे, कविता वाडीले, निर्मला यादव, विद्या देशमुख, प्रतिज्ञा सावंत, मोहन शिंदे वाटप व नियोजन करत आहेत.