

जत : जत तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह अन्य योजनेतून घरकुलांची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर इतर स्थानिकांची घर बांधकामेही सुरू आहेत. शासनाने दि. 8 व 30 एप्रिल रोजी वाळू रेती, निर्गती धोरण निश्चित केले. मात्र सद्यस्थितीत घरकुलांचे बांधकाम सुरू असल्याने वाळूची गरज आहे. शासनाने संदिग्धता दूर करून वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
नव्या वाळू धोरणानुसार शासनाने घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा केली. त्यानुसार शासन निर्णय निर्गमित केले. मात्र पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपल्यावरही वाळू उपलब्ध होत नसल्याने, मोफत वाळू धोरणाची अंमलबजावणी कधी होणार? असा प्रश्न घरकुल लाभार्थी यांच्यातून उपस्थित होत आहे.
तालुकास्तरीय समितीकडून वाळू गट निश्चित करावयाचे आहे. त्यानुसार रूपरेषा निश्चित केली आहे. या समितीने वाळू गट निश्चित केलेल्या एकूण वाळू गटाच्या दहा टक्के वाळू गट घरकुलांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. जत तालुक्यातील पूर्व भागात कोरडा नदी, सिंगनहळ्ळी, काशिलिंगवाडी, सोनलगी, सुसलाद या भागात वाळूचे स्त्रोत आहेत. या नदीपात्रात बांधकामास योग्य मुबलक प्रमाणात वाळूसाठा आहे, मात्र घरकुलांसाठी वाळू गट निश्चित न झाल्याने घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहे. संख येथील अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत जप्त रेती साठ्यातून एकमेव लाभार्थ्याला वाळू मिळाली आहे.