

तासगाव : वायफळे (ता. तासगाव) येथील बनावट सोने वेळोवेळी गहाण ठेवून त्याबदल्यात तब्बल 14 लाख 21 हजार 470 रुपयांचे कर्ज उचलून ब्रम्हा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेची फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी हातीद (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील रोहित बबन घाडगे या संशयितांचा समावेश आहे. संस्थेच्या वायफळे शाखा व्यवस्थापक रेश्मा जगदीश भोसले (रा. वायफळे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
25 डिसेंबर 2025 रोजी घाडगे याने ब्रम्हा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वायफळे शाखेत खाते सुरू केले. त्यानंतर 17 डिसेंबर 2025 रोजी त्याने 38.580 ग्रॅम सोने गहाण ठेवले. या सोन्याची खातरजमा संस्थेचे व्हॅल्युएटर प्रकाश भगवान पाटील यांनी तेजस ज्वेलर्समार्फत करून घेतली असता, सोने खरे असल्याचा दाखला देण्यात आला. या सोने तारणावर 3 लाख 40 हजार 470 रुपयांचे कर्ज त्याला देण्यात आले. यानंतर 19 डिसेंबर 25 रोजी पुन्हा 38.580 ग्रॅम सोने तारण ठेवून 3 लाख 40 हजार रुपये कर्ज उचलण्यात आले.
तसेच 5 जानेवारी 2026 रोजी त्याने 78.490 ग्रॅम सोने गहाण ठेवून 7 लाख 41 हजार रुपयांचे कर्ज घेतले. अशा प्रकारे डिसेंबर 25 ते 5 जानेवारी 26 या कालावधीत घाडगे याने एकूण 14 लाख 21 हजार 470 रुपयांचे कर्ज घेतले. 20 जानेवारी 2026 रोजी घाडगे पुन्हा 77.390 ग्रॅम सोने घेऊन शाखेत आला. पण संस्थेतील कर्मचाऱ्यांना संशय आला. दोन बांगड्या व एक कडा यावर वरून सोन्याचा लेप असून आतमध्ये चांदी असल्याचे स्पष्ट झाले.