Fourteen-year-old girl's organ donation gives life to three
अवयवदानFile Photo

Organ Donation | चौदावर्षीय मुलीचे अवयवदान; तिघांना जीवदान

सांगलीतून ग्रीन कॉरिडॉरने अवयव पुण्याला रवाना
Published on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

अवघी चौदा वर्षांची ती... खेळण्या- बागडण्याचे दिवस... एक दिवस बाथरूममध्ये पाय घसरून पडली अन् ती परत कधीच उठली नाही. डॉक्टरांनी मेंदू मृत राजनंदिनी पाटील (ब्रेनडेड) झाल्याचे जाहीर केले.

तिच्या नातेवाईकांनी धाडस दाखवत अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी तिचे यकृत, दोन्ही किडन्या पुण्याला पाठविल्या, त्यातून तिघांना जीवदान मिळाले तर डोळे सांगलीतच दान केले, त्यासाठी पोलिसांनी सांगली ते पुणे ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता.

राजनंदिनी संतोष पाटील (वय १४) असे तिचे नाव, बागणी (ता. वाळवा) येथील राजनंदिनी कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत नववीत होती. गेल्या शुक्रवारी ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली. तिला बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. चार ते पाच दिवसांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी ब्रेनडेड म्हणून जाहीर केले.

डॉ. वासीम मुजावर यांनी तिच्या कुटुंबीयांना अवयवदानासाठी तयार केले. ती अवयवरूपात जिवंत राहील या भावनेने कुटुंबीयांनी अवयवदानाला प्रतिसाद दिला. तिला सांगलीच्या उषःकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शनिवारी सकाळी रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद पारेख, वैद्यकीय संचालक डॉ. अजित मालाणी यांनी तातडीने सर्व प्रक्रिया पूर्ण केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास रुग्णवाहिका सज्ज केली. दरम्यानच्या काळात पोलिसांशी संपर्क साधून ग्रीन कॉरिडॉरसाठी प्रयत्न झाले.

कराड, सातारा, पुणे पोलिस कार्यालयांशी संपर्क साधून पुण्यापर्यंत कॉरिडॉरची व्यवस्था केली. उषःकाल हॉस्पिटलपासून शहरातील चौका- चौकात पोलिस तैनात होते. त्यानंतर रुग्णवाहिकेतून यकृत, दोन्ही किडन्या पुण्यातील रुबी, दीनानाथ व डी. वाय. पाटील रुग्णालयाला पाठविण्यात आल्या, तर डोळे सांगलीतील रुग्णालयाला दान देण्यात आले.

त्यातून दोघांना दृष्टी मिळणार आहे. अवयव नेताना राजनंदिनीच्या वडिलांसह नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. सिव्हिल सर्जन विक्रमसिंह कदम, डॉ. संजय कोरगेकर, जिल्हा समन्वयक अविनाश शिंदे, उषःकालच्या स्वाती काकते यांनीही या प्रक्रियेत सहकार्य केले.

राजनंदिनी ही कुटुंबात सर्वांची लाडकी होती. तिचे डोळे सुंदर होते. या सुंदर डोळ्यांनी ती जग बघेल, अशी आशा आहे. काहीजणांना अवयवांची गरज होती. म्हणून कुटुंबाने एकत्रित अवयवदानाचा निर्णय घेतला. तिच्यामुळे तिघांना जीवदान मिळणार आहे. ती अवयवरूपाने कायम जिवंत राहील.

धनंजय पाटील, राजनंदिनीचे चुलते, बागणी

पश्चिम महाराष्ट्रात अवयवदान चळवळ वाढत आहे. वर्षभरात चारजणांनी अवयव दान करून अनेकांना जीवनदान दिले. सध्या नेत्र पंधरवडा सुरू आहे. या पंधरवड्यात अवयव व नेत्रदान केलेल्यांच्या नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयामार्फत सत्कार करणार आहोत.

डॉ. विक्रमसिंह कदम, सिव्हिल सर्जन, सांगली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news