

कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील एका सिमेंट आर्टिकल कारखान्यातून चार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, तासगाव पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला आरब इंद्रपाल रावत (वय 4) हा मुलगा शुक्रवार, दि. 12 सप्टेंबररोजी दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे. त्याचे वडील इंद्रपाल कुंजीलाल रावत (वय 28) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.
तासगाव-सांगली रोडवरील नागाव फाट्याजवळ ‘हिना सिमेंट’ नावाच्या कारखान्यात इंद्रपाल रावत काम करतात. दुपारी 3 वाजता त्यांचा मुलगा कारखान्याजवळील परिसरात खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.
आरब हा हिंदी बोलतो. तो दिसायला मध्यम शरीरयष्टीचा, गोरा रंग आणि उंची अंदाजे 3 फूट आहे. त्याचे नाक सरळ आणि डोळे काळे आहेत. त्याने डोक्याचे केस काढले असून, निळ्या रंगाची जीन्स पँट आणि लाल रंगाचा टी-शर्ट घातला होता, अशी माहिती पालकांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अन्नछत्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. अपहृत मुलाबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.