कार खड्ड्यात कोसळून पुण्याचे चारजण ठार

ट्रकच्या धडकेमुळे कार गेली पाण्यात; एक बचावला
Four killed in Pune after car falls into ditch
कुरळप : अपघातातील कार.Pudhari File Photo
Published on
Updated on

कुरळप : ट्रकने बाजूने घासल्यामुळे कार खड्ड्यात कोसळून पुण्यातील चौघे जागीच ठार झाले, तर एक जखमी झाला. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडीनजीक (ता. वाळवा, जि. सांगली) शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्यादरम्यान हा भीषण अपघात झाला.

आनंद भीमराव कदम, महंमदअली शौकतअली सय्यद, जेकेब मायकल पाटोळे व युसूफ रफिक शेख (सर्व रा. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी शुभम गणेश चवंडके (गवळीवाडा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ट्रकचालक फकीर आप्पा जीड्डीमनी याच्यावर कुरळप पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुणे येथील पाच मित्र शुक्रवारी रात्री उशिरा कारने (एमएच 12 एक्सएच 3278) गोव्याला निघाले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांची कार पुणे-बंगळ महामार्गावरील तांदुळवाडीजवळ आली असता, कोल्हापूरच्या दिशेने जाणार्‍या ट्रकच्या (केए 22 डी 6999) चालकाने त्यांच्या कारला डाव्या बाजूने घासले. त्यामुळे कार बाजूला ओढ्याच्या पुलाचे काम सुरू असणार्‍या खड्ड्यात गेली. यावेळी कारचा समोरील भाग खड्ड्यात असणार्‍या गाळात अडकला. त्यामुळे खड्ड्यातील पाणी कारमध्ये शिरले. चारीहीजण कारमध्ये अडकून पडले. त्यांना काहीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे पाण्यात बुडाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दीपक खोमणे यांनी अपघाताची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, उपनिरीक्षक सुनील माने यांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अभिषेक शिरोळे यांनी मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली. पोलिस उपनिरीक्षक सुनील माने तपास करीत आहेत.

कार 36 लाखांची, मात्र...

प्रवासाला निघालेल्या युवकांकडे असणारी कार अत्याधुनिक होती. दिवाळीतच ही कार घेतली होती. मात्र स्वयंचलित प्रणाली व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही कार चौघांचा जीव वाचवू शकली नाही, याची चर्चा कुरळप आरोग्य केंद्र परिसरात उपस्थित नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यात सुरू होती. कार समोरून उभी पाण्यात पडल्याने एअरबॅगही उघडल्या नाहीत.

सुट्टी असल्यामुळे गोवा पर्यटनाचे नियोेजन

रात्री पाचजण गोव्याला सुट्टी आनंद घेण्यासाठी निघाले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला. गाडीत पाचजण होते, यापैकी चौघे या अपघातात जागीच मृत झाले, तर यातील एक बचावल्याने ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’चा प्रत्यय आल्याचे बोलले जात होते.

महामार्गाचे काम... खबरदारीच नाही

सध्या या महामार्गाचे काम सुरू आहे. घटनास्थळानजीक अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ठेकेदाराने आवश्यक खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडल्याचे मृताच्या नातेवाईकाने सांगितले. काम सुरू असल्याचे वाहन चालकांना लक्षात येत नसल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांतून होत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news