

विटा : सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग करून बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका सराईत तरुणाला विटा पोलिसांनी आज गुरुवारी दुपारी रंगेहात अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विटा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये संशयितांकडून एकूण 4 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल आणि सॅक असा एकूण 2 लाख 67 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी धीरज सतीश चव्हाण (वय 21, रा. पारे रोड, बजरंगनगर, विटा) या तरुणाला अटक केली. त्याला पिस्तूल पुरवणाऱ्या पाजी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. सेंधवा, मध्य प्रदेश) या मुख्य संशयिताविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अंमलदार सूर्यकांत साळुंखे यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शस्त्रबंदी लागू आहे, असे असतानाही संशयित धीरज चव्हाण हा विटा ते तासगाव रस्त्यावरील एका मंगल कार्यालयसमोर संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी तिथे सापळा रचून धीरजची झडती घेतली. यावेळी त्याच्या सॅक व ताब्यातून बेकायदेशीर, बिगरपरवाना असणारी 4 पिस्तूल (अग्निशस्त्रे) आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 3(5), भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37(1)(3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.