कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा
मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आमदार सुमन पाटील व रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मारला आहे. कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील याच्या समर्थकांनी आज, (शुक्रवार) सकाळी घरात घुसून बेदम मारहाण केली. यावेळी संजयकाका पण उपस्थित होते. त्यांनीही मला मारहाण केल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे. तसेच माझ्या ७६ वर्षांच्या आईला ढकलून दिले आणि कुटुंबीयांनाही मारहाण केल्याचे मुल्ला यांचे म्हणणे आहे. ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अय्याज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते. यावेळी संजय काका पाटील घरी आले. मुल्ला यांनी घरी चहा करायला सांगितला. तोपर्यंत दारात दोन-तीन गाडी येऊन थांबल्या. गाड्यांमधून माजी खासदार संजय पाटील यांच्यासह दहा-पंधरा जण उतरले. त्यांनी थेट घरात घुसून अय्याज मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना वाचवायला आलेले त्यांच्या घरातील महिला व मुलांनाही शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.