

सांगली : माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे लवकरच भाजपामध्ये परतणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची मंगळवारी मुंबईत वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्ती युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.
अण्णासाहेब डांगे हे भाजपाचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, जनता पक्ष तसेच भारतीय जनता पक्षात काम केलेले आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी प्रभावी कामकाज केलेले आहे. ते शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री होते. दरम्यान 2002 मध्ये ते पक्षांतर्गत मतभेदामुळे भाजपमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी लोकराज्य नावाने स्वतंत्र राजकीय पक्ष सुरू केला. मात्र हा पक्ष प्रभाव पाडू शकला नाही. डांगे यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यांचे राष्ट्रवादीत मन रमले नाही.
दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी डांगे यांच्याशी संपर्क साधून भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केले. मंगळवारी मुंबईत वर्षा बंगल्यावर अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे, विश्वनाथ डांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, समित कदम हेही उपस्थित होते. डांगे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.