

जत : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी बांधवांसाठी जेवण घेऊन निघालेली वाहने पोलिसांनी अटल सेतूवर रोखली. या कारवाईवर माजी आ. विक्रमसिंह सावंत यांनी पोलिसांना जाब विचारत आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सावंत व पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. अखेर पोलिसांनी वाहने सोडून दिल्यानंतर आंदोलक शांत होऊन आझाद मैदानावर दाखल झाले.
आंदोलकांची अन्नकोंडी होत असल्याची मराठा बांधवांची धारणा निर्माण झाली होती. दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आ. विक्रमसिंह सावंत त्यांच्या सहकार्यांसह मराठा बांधवांना जेवण घेऊन निघाले होते. यावेळी त्यांची वाहने अटल सेतूवर गेल्यानंतर पोलिसांनी अडवली. यावेळी माजी आ. सावंत यांनी पोलिसांना गाड्या का अडवताय, असा जाब विचारत, हे आंदोलन शांततेत सुरू आहे. हक्काच्या मागण्यांसाठी समाजबांधव रस्त्यावर उतरला आहे. ही रस्त्यावरची सनदशीर मार्गाने सुरू असलेली लढाई आहे. पोलिस यंत्रणेचा व बळाचा वापर करून किंवा दडपशाही करून आंदोलन थांबणार नाही. मराठा समाजाच्या लोकभावना असल्याचे माजी आमदार सावंत म्हणाले. माजी आ. सावंत यांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन समर्थन व्यक्त केले.
जत तालुक्यातील वाळेखिंडी, अचकनहळ्ळी, जतहून सकल मराठा समाजाच्यावतीने विविध खाद्यपदार्थ मुंबईला पाठवले आहेत. यामध्ये सुमारे पाच हजार भाकरी, केळी, बिस्किटे, पाणी बाटल्या आदी खाद्यपदार्थ कंटेनरमध्ये पाठवले आहेत. मार्केट समितीचे सभापती सुजय शिंदे, तात्या शिंदे, समाधान शिंदे यांनी भाकरी व खाद्यपदार्थ पाठवले आहेत.