

सांगली : गेल्या चार वर्षांपासून राज्यात खरीप पिकांच्या लागवड क्षेत्रात सातत्याने चढ-उतार होत आहे. सन 2024 च्या हंगामापेक्षा चालू खरिपात क्षेत्र घटले आहे, तर 2023 च्या हंगामापेक्षा 24 च्या हंगामात पेरणी क्षेत्र वाढले होते. अर्थात अनियमित पाऊसमान आणि धान्याच्या किमतीतील अस्थिरता यामुळे कोरडवाहू पिकांकडे शेतकरी फिरवित असलेली पाठ याला कारणीभूत ठरत आहे.
चालू खरीप हंगाम प्रथमच अभूतपूर्व स्थितीत सुरू झाला. यावेळी मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात राज्यात सर्वत्रच मुसळधार प्रमाणात हंगामपूर्व पाऊस झाला. पुढे जूनमध्ये देखील एकंदर चांगला पाऊस पडला. तरीदेखील किमान 20 जिल्ह्यांमध्ये या महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट आहे. यापैकी बहुतेक जिल्हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत, तर तीन मध्य महाराष्ट्रातील आहेत. यावर्षी जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची तूट असलेल्या किमान 20 जिल्ह्यांपैकी, वाशिममध्ये सर्वाधिक 86 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.
वाशिमनंतर अकोला - 77 टक्के, नागपूर - 74 टक्के, हिंगोली - 73 टक्के, भंडारा - 70 टक्के, गडचिरोली - 68 टक्के, बीड - 67 टक्के, जालना - 64 टक्के, गोंदिया - 62 टक्के, सोलापूर -59 टक्के आणि परभणी - 58 टक्के या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. अनेक जिल्हे मोठ्या पावसाच्या तुटीचा सामना करत आहेत. उशिरा किंवा अपुरा पाऊस पडल्याने खरीप पिकाला याचा फटका बसू शकतो. ज्यामुळे शेतकर्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि येणार्या हंगामातील एकूण कृषी उत्पादकतेवरदेखील परिणाम होऊ शकतो. नेमका याचाच परिणाम यावेळच्या खरीप हंगामावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चालू म्हणजे सन 2025 च्या खरीप हंगामासाठी जवळपास 139 लाख 45 हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. यापैकी 89 लाख 29 हजार हेक्टर क्षेत्रात जूनअखेर खरिपाची पेरणी झाली आहे. यात प्रामुख्याने खरीप ज्वारी, सोयाबीन, भात, मूग, उडीद, तूर, कापूस आणि मका या प्रमुख पिकांचा समावेश आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांत खरीप मका पिकाचे क्षेत्र घटत होते. 2024 च्या खरिपात राज्यात जेमतेम 5 लाख 87 हजार हेक्टरमध्ये मका होता. तो यावेळी तब्बल 8 लाख 17 हजार हेक्टर क्षेत्रात लागवडीवर पोहोचला आहे. प्रामुख्याने सातत्याने असलेली मागणी आणि किमतीमधील स्थिरता याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी मका पिकाचे क्षेत्र तब्बल 2 लाख 30 हजार हेक्टरने वाढले आहे. एकीकडे सोयाबीनसारख्या मागणी असलेल्या तेलबिया पिकाची लागवड कमी होत असताना, प्रमुख तृणधान्य असलेल्या मका पिकाच्या क्षेत्रातील वाढ आश्चर्यकारक ठरत आहे.
सन 2022 पासून 2025 पर्यंतच्या प्रतिवर्षीच्या खरीप क्षेत्रात विविध पिकांची पेरणी कमी-जास्त होत आहे. सन 2022 मध्ये राज्यात खरिपाचे 151 लाख 33 हजार हेक्टर उपलब्ध क्षेत्र होते, तर त्यावेळी 152 लाख 97 हजार हेक्टरमध्ये खरिपाची लागवड झाली होती. सन 2023 च्या खरिपात उपलब्ध क्षेत्र घटून ते 142 लाख हेक्टर होते, तर पेरणी फक्त 123 लाख 78 हजार हेक्टर क्षेत्रात झाली होती. पुढच्यावर्षी म्हणजे सन 2024 मध्ये 142 लाख 2 हजार हेक्टर क्षेत्र खरिपासाठी उपलब्ध होते, तर 141 लाख 3500 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती आणि चालू म्हणजे सध्याच्या 2025 च्या खरिपासाठी 139 लाख 45 हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून जूनअखेर राज्यात अवघी 89 लाख 29 हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली आहे.
कोरडवाहू खरीप पिकांच्या किमतीत स्थिरता नाही. यामुळे केलेला खर्चदेखील निघत नसल्याने बहुसंख्य शेतकरी खरिपाला बगल देऊन बागायती पिके, भाजीपाला लागवडीकडे वळत आहेत. याचा देखील खरिपाचे क्षेत्र कमी होण्यावर मोठाच परिणाम होत आहे. मागीलवर्षी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4 हजार 892 रुपये प्रतिक्विंटल होती, मात्र बाजारात सोयाबीनची खरेदी मात्र जास्तीत जास्त 3900 रुपये ते 4100 रुपये दराने होत होती. या एकाच उदाहरणावरून शेतकरी खरिपाच्या लागवडीला बगल का देतोय हे स्पष्ट होतंय.