

शिराळा शहर : गेल्या आठवड्यात तालुक्यात चांगला पाऊस झाला. परिणामी वारणा नदीची पाणी पातळी अचानक वाढली. त्यामुळे शिराळे खुर्द येथे नदीकाठावर असलेल्या झाडांवर आठ वानरे आणि त्यांची चार पिले अडकून पडली होती. भुकेने व्याकुळ झालेली ही वानरसेना अन्नासाठी तडफडत होती. प्राणीमित्रांनी दीडशे मीटर पोहत जाऊन त्यांना जीवदान दिले.
या वानरांना वाचवण्यासाठी वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, बचाव पथकाचे संतोष कदम, संजय पाटील, सचिन पाटील, किरण मोरे यांनी निर्धार केला. सचिन पाटील आणि किरण मोरे यांनी पाण्यात उतरायचे ठरवले. या दोघांनी 150 मीटर पोहत जाऊन त्या झाडाला दोरी बांधली आणि तीच दोरी नदीकाठावर असणार्या झाडाला बांधली. एखाद्या चित्रपटासारखा हा प्रसंग सुरू होता. त्यामुळे गर्दी हटवण्यात आली. तासाभरानंतर ही वानरे काठावर आली.