

सांगली : जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. शिराळा तालुक्यात मात्र अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवारी (दि.२६) एक दिवस सुट्टी जाहीर केली आहे.
शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली असली तरी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी शाळांमध्ये उपस्थित राहून प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज पहावे, असा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.