

सांगली : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पूरपट्ट्यातील नागरिकांनी सतर्क राहावे. पाऊस, पाणी वाढल्यास प्रशासनाकडून सूचना मिळताच नागरिकांनी सुरक्षितस्थळी अथवा महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतर करावे, असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे.
सोमवारी दुपारी दोन वाजता सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 25 फूट 10 इंच होती. पाणी पातळीत वाढ झाल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. सांगलीत कृष्णेच्या पाण्याची इशारा पातळी 40, तर धोका पातळी 45 फूट आहे. धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण व धरणातून होणारा विसर्ग यावर कृष्णेची पाणी पातळी अवलंबून राहणार आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सांगलीत कृष्णेची पाणीपातळी 21 फूट 6 इंच होती. सायंकाळी साडेसहा वाजता पाणी पातळी 22 फूट झाली. सोमवारी सकाळी 8 वाजता पाणीपातळी 24 फूट 9 इंच झाली. सोमवारी दुपारी 2 वाजता 25 फूट 10 इंच झाली. आयुक्त गांधी यांनी पूरपट्ट्याची पाहणी केली.
कृष्णेची पाणीपातळी 30 फुटावर आल्यावर सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड नाल्यावरील पूल व परिसरात पाणी येते. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन) नकुल जकाते, सहायक आयक्त सहदेव कावडे, उपअभियंता महेश मदने तसेच स्वच्छता निरीक्षक यांनी सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट परिसराची पाहणी केली. निवारा केंद्रासाठी तीन ठिकाणी पाहणी केली. मार्केट यार्डात गुलाबराव पाटील सहकार प्रशिक्षण केंद्र, गणेशनगर रोटरी हॉल, विश्रामबाग सखी मंच हॉल या ठिकाणी भेट दिली. पूरपट्ट्यातील स्थलांतरितांसाठी निवारा केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.