Miraj crime : मिरजेत 5 पिस्तूल, 12 जिवंत काडतुसे जप्त

दोघांना अटक, सराईत गुन्हेगाराचा समावेश; सांगली एलसीबीची कारवाई
Miraj crime News
Published on
Updated on

सांगली : मिरज शहरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख 32 हजार रुपये किमतीची पाच पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मलिक सलीम शेख (वय 25, रा. राजावत कॉलनी, दत्तनगर, बामणोली-कुपवाड, ता. मिरज) आणि प्रथमेश ऊर्फ पाट्या सुरेश पाटोळे (22, रा. बामणोली-कुपवाड, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील आणखी संशयित राजेंद्रसिंग ऊर्फ गोलुसिंग वडवानीसिंग टकराना (रा. उमरटी, ता. बलवाडी, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) हा पसार झाला आहे.

मिरजेतील ऑक्सिजन पार्क येथे पिस्तूल विक्रीसाठी दोघे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकातील अनिल ऐनापुरे यांना मिळाली होती. त्यानुसार सावंत यांच्या पथकाने दि. 19 रोजी रात्री मिरजेत सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार मलिक शेख आणि प्रथमेश ऊर्फ पाट्या पाटोळे हे ऑक्सिजन पार्क येथे आले. तेव्हा छापा टाकून त्या दोघांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असणार्‍या सॅकमध्ये देशी बनावटीची पाच पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे मिळून आली.

याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी मध्य प्रदेश येथील राजेंद्रसिंह ऊर्फ गोलुसिंग टकराना याच्याकडून पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. दोघांना अटक केली आहे. दरम्यान, मलिक शेख हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करणार्‍यांचे रॅकेट सक्रिय असल्याचे आता समोर आले असून या रॅकेटचा शोधही पोलिस घेत आहेत. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक कुमार पाटील, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, आमसिध्द खोत, बसवराज शिरगुप्पी, बाबासाहेब माने, इम्रान मुल्ला, संकेत मगदूम, सुशील मस्के, शिवाजी शिद, अनंत कुडाळकर, रोहन घस्ते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जिथे स्थानिक पोलिसांचे धाडस नाही, तिथे ‘सांगली एलसीबी’

मध्य प्रदेशमधील उमरटी गावातून मोठ्या प्रमाणात देशी बनावटीच्या पिस्तुलांची तस्करी केली जाते. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेलेल्या काही पोलिसांनाच मारहाण करून त्यांना कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला होता. मध्य प्रदेशमधील स्थानिक पोलिसही त्या ठिकाणी छापेमारी करण्याचे धाडस करीत नाहीत, अशा ठिकाणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने छापेमारी केली. त्यामुळे या पथकाचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी विशेष कौतुक केले.

एलसीबी पथकाची मध्य प्रदेशात छापेमारी

मिरजेत पिस्तुलांची तस्करी करणार्‍या राजेंद्रसिंग ऊर्फ गोलुसिंग याच्या मध्य प्रदेश येथील उमरटी गावात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे नितीन सावंत यांच्या पथकाने छापेमारी केली, परंतु या छाप्यात तो मिळून आला नाही. राजेंद्रसिंग हा मध्य प्रदेशमधील सराईत पिस्तूल तस्कर असून तो देशभरात अनेक ठिकाणी विनापरवाना देशी बनावटीच्या पिस्तुलांच्या विक्रीचे रॅकेट चालवित असल्याचेही तपासात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news