

कवठेमहांकाळ : बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बैलगाडी शर्यतीदरम्यान एका व्यक्तीची दुचाकी चोरीस गेली होती. कवठेमहांकाळ पोलिसांनी संशयिताचा शोध घेत चोरीस गेलेली ही दुचाकी जप्त केली. याबाबत दत्तात्रय पांढरे (रा. देशिंग) यांनी फिर्याद दिली होती. सुजित निवृत्ती ढेरे (वय 20, रा. कुची) असे संशयिताचे नाव आहे.
दत्तात्रय पांढरे हे दि. 9 नोव्हेंबररोजी बोरगाव येथे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी गेले होते. त्यांनी आपली दुचाकी (क्र. एमएच 10 एझेड 4451) एका हॉटेलजवळ उभी केली होती. रात्री परत आल्यानंतर दुचाकी चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याकडील परशुराम स्वामी यांना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलसमोर नंबरप्लेट नसलेली दुचाकी घेऊन एक तरुण फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर, संजय कांबळे, परशुराम स्वामी, श्रीमंत करे, नागेश मासाळ, सिद्धराम कुंभार, अभिजित कासार सहभागी होते.