

पलूस : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील बांबवडे येथील तासगाव-कराड महामार्गालगत कदममळा येथे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पाच फूट लांबीची मगर आढळून आली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे व पलूस पोलिसांच्या मदतीने वन विभागाच्या अधिकार्यांनी मोहीम राबवून मगरीला पकडले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कदममळा येथे अरुण पाटील यांची घराजवळ परसबागेत केळी आहे. याचठिकाणी रात्री त्यांना मगर दिसून आली. अरुण पाटील व माजी सैनिक मनोहर पाटील यांनी 112 नंबर डायल करून पोलिसांना माहिती दिली. पलूस पोलिस लगेच घटनास्थळी आले. यावेळी गावातील शेकडो तरुणांनी या मगरीला घेराव घातला. पलूस पोलिसांनी तत्काळ वन खात्याशी संपर्क करून मगर असल्याची माहिती दिली. कडेगाव वन अधिकारी रामदास जाधव तासाभरात त्या ठिकाणी हजर झाले. सर्पमित्र समय कांबळे, इतर साथीदार व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने रात्री 11 च्या सुमारास वन अधिकार्यांनी ही मगर पकडली.
मगर आढळल्यामुळे वस्तीवर राहणार्या ग्रामस्थांमध्ये व महामार्गालगत भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात आतापर्यंत कधीही मगर दिसली नाही. सध्या तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. ओढ्या-वगळीतून शेतात खूप पाणी साचले आहे. या पाण्यामधूनच मगर लोकवस्तीत शिरली असावी, अशी चर्चा गावात सुरू आहे.