

तासगाव शहर ः विधानसभा निवडणुकीनंतर आमदार रोहित पाटील यांनी कामांचा धडाका लावला आहे. प्रत्येक विभागामध्ये जाऊन आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आमदार रोहित पाटील यांनी तासगाव नगरपालिकेमध्ये जाऊन प्रत्येक विभागाची माहिती घेतली. ही बैठक तब्बल साडेतीन तास चालली. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत पाटील यांनी अधिकार्यांकडे विचारणाही केली.
रोहित पाटील यांनी तासगाव पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. सकाळी साडेअकरा वाजता पालिकेच्या सभागृहामध्ये मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील, कार्यालय अधीक्षक प्रतिभा जाधव यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शिक्षण विभागापासून आढावा बैठकीस सुरुवात करण्यात आली. पोषण आहार, कंत्राटी शिक्षक नेमणूक निकष, सीएसआर फंडामधून कोणत्या शाळा डिजिटल करता येतील, याची माहिती घेऊन शाळांना जे जे गरजेेचे आहे, ते सर्व उपलब्ध करू, असे आश्वासन पाटील यांनी दिले. लवकरच प्रत्येक शाळेत मुलींसाठी शौचालय, सीसीटीव्ही, विजेची व्यवस्था करू, असेही ते म्हणाले.
यानंतर बांधकाम विभागाचा आढावा घेण्यात आला. शहरात 2019 मध्ये भुयारी गटार योजना मंजूर करण्यात आली. मात्र सध्या ही योजना बंद आहे. कंत्राटदाराने काम सोडून दिले आहे, कामाचा दर्जा चांगला नाही, असे सांगून प्रशासक म्हणून दुजाभाव नको, अशा सक्त सूचना पाटील यांनी केल्या. तत्कालीन मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या चौकशीची मागणी नागरिकांनी केल्यानंतर जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून चौकशी लावण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. ते म्हणाले, प्रमुख वस्त्यांवर पथदिवे नाहीत, रस्ते चांगले नाहीत, मात्र ओढ्यात पेव्हिंग ब्लॉक, पथदिवे कसे बसवले, याची चौकशी करू.
पाणीपुरवठा विभागाकडून योग्य व्यवस्थापन होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. यावर पाटील यांनी शहरात स्वच्छ आणि योग्य पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी नागरिकांकडून भरून घेण्यात आलेल्या पैशांचे पुढे काय झाले, असा सवालही त्यांनी केला. वीजपुरवठा विभागाचा आढावा घेताना अनेक भागात पथदिवे नसल्याचे दाखवून त्यासाठी निधी मंजूर करून आणू, असे आश्वासन दिले.
आमदार रोहित पाटील म्हणाले, तासगाव शहरात एवढे मोठे कस्तुरबा रुग्णालय उभे आहे. मात्र, याठिकाणी अद्याप सर्व सोयी उपलब्ध नाहीत. लवकरच येथे डायलिसीस सेंटर मंजूर करून आणू. वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा करून अधिकचा कर्मचारी वर्गही मंजूर करून आणू.
आमदार रोहित पाटील म्हणाले, मागील दहा वर्षांत पालिकेमध्ये काय झाले, यावर मला चर्चा करायची नाही. मात्र, नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक याठिकाणी झालीच पाहिजे. इथून पुढे कोणत्याही कामात मला दिरंगाई, चूक चालणार नाही.