

सांगली : उन्हाची तीव्रता वाढत असून, यावर्षीचा पहिला पिण्याचा पाण्याचा टँकर उंबरगाव (ता. आटपाडी) येथे कालपासून सुरू करण्यात आला आहे. या गावासह 9 वाड्यांना आता दोन टँकरने पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. इतर ठिकाणाहूनही आता टँकरसाठी मागणी होत आहे. यंदा सांगली जिल्ह्यातील एप्रिल ते जूनअखेर 32 गावे, 13 वाड्यांना संभाव्य पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एप्रिल ते जूनअखेर 59.60 कोटींचा संभाव्य पाणी टंचाई निवारण कृती आराखडा करण्यात आला आहे.
गतवर्षी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव आणि शिराळा तालुक्यातील काही गावांना टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा सुरू होता. गतवर्षी शंभरहून अधिक टँकर सुरू होते. यावर्षी 32 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा लागण्याची शक्यता आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांचा अंदाज घेत प्रशासनाच्यावतीने आकडा निश्चित करण्यात आला आहे. गावांचे सर्वेक्षण होऊन सार्वजनिक विहिरींतील गाळ काढणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, प्रगतिपथावरील नळ योजना गतीने पूर्ण करणे, नवीन विंधन विहिरी खोदणे, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, अशा उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार योजनांसाठी सुमारे 60 कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
यावर्षी प्रशासनाने 385 विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन केले आहे. टंचाईग्रस्त गावे व वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन असून, 292 टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. टंचाईग्रस्त गावांसाठी सुमारे 59 कोटी 60 लाख 37 हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नवीन विंधन विहिरी, कूपनलिकांसाठी 54 लाख 30 हजार रुपयांचा खर्च गृहित धरण्यात आला आहे.