

सांगली : या सप्ताहात नारळ, शेंगदाण्याचे दर वाढले आहेत. इतर किराणा मालाचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. शेंगदाण्याच्या दरात प्रति किलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. शेंगदाणे आता 140 रुपये किलो झाले आहेत. नारळाच्या दरात पुन्हा दहा रुपयांनी वाढ झाली असून, नारळ प्रति नग 35 ते 40 रुपये झाला आहे.
गेल्या आठ दिवसापासून नारळाची आवक कमी झाली आहे. यामुळे नारळ 30 रुपयावरुन 40 रुपये नग झाला आहे. शाळू, ज्वारी आणि तांदळाच्या दरात गेल्या सप्ताहातच वाढ झाली आहे. शाळू ज्वारी 4 हजार ते 4 हजार 500 रुपये क्विंटल आहे. तांदूळ 4,200 हजार ते 4600 रुपये क्विंटल झाला आहे. खाद्यतेलाचे दर महिन्यापासून स्थिर आहेत. गहू 3 हजार 700 ते 3 हजार 800 रुपये आहे. मसूरडाळ 75 ते 80 रुपये किलो झाली आहे. सूर्यफूल तेलाचा दर 154 रुपये झाला आहे. शेंगतेलाचा किरकोळ विक्रीचा दर 164 आहे. सरकी तेल डब्याचा दर (15 किलो) 2 हजार 300 रुपये आहे. अधिक मागणी असलेल्या तांदळाचा दर प्रति किलो 30 ते 70 रुपये आहे. शाळू, ज्वारी 50 ते 52, हायब्रीड 40 ते 42, गूळ 50 ते 55, रवा 50, तर मैदा 48 ते 50, मूग 120 व मसूरडाळ 80 रुपये किलो आहे.
गेल्या पंधरवड्यापासून अंड्यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी अंड्यांचा दर पुन्हा पाच रुपयांनी वाढून आता दर 705 रुपये शेकडा झाला. डझन अंडी दर 90 रुपयावर गेला आहे. ब्रॉयलर जिवंत कोंबडीचा दर पुन्हा वाढला आहे. आता कोंबडीचा दर 134 रुपयावरुन 148 रुपये किलो झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून मटणाचा दर किलोला 760 रुपये आहे. चिकनचा दर 240 ते 260 रुपयांच्या घरात आहे. गावरान कोंबड्याचा दर 340 ते 350 रुपये (जिवंत दीड ते दोन किलो) आहे. अंडी दर वाढत आहे. आता एक अंडे काही ठिकाणी 10 रुपयांनी विकले जात आहे. विटा येथील अंड्यांचा घाऊक दर 700 रुपये शेकडा आहे. देशी अंडे बारा रुपयांना एक तर 120 रुपये डझनने विक्री सुरु आहे. मासळीची आवक कमी झाली असून दरात मात्र तीस ते पन्नास रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती मासळी विक्रेते लालू शेख यांनी दिली.
सुरमई 700, तर पापलेट 900 रुपये किलो
या सप्ताहात मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. सुरमईचा दर 600 ते 700 रुपये असून, पांढरा पापलेटचा दर तर 900 रुपये किलो झाला आहे. समुद्रातील मासळी (प्रति किलोचे दर) असे : काळा पापलेट 700 ते 800, सुरमई 600 ते 700, रावस 250 ते 280, वाम 370 ते 380, बोंबील 350 ते 400, कोळंबी 250 ते 300.
नदीतील मासळी : शेंगटा 200 ते 250, रहू 150 ते 200, कटला 230 ते 240, मरळ 350 ते 360, वाम 350 ते 360, नदीतील खेकड्याचा दर 160 ते 200 रुपये किलो आहे.