

जत : शिंगणापूर (ता. जत) येथे पीक पाहणीकरिता गेलेल्या महसूल सेवक महिला (कोतवाल) यल्लूबाई हिकमती नाईक (वय 49) यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना लवटे यांच्या शेतात शनिवारी घडली. याप्रकरणी यल्लूबाई नाईक यांनी जत पोलिसात फिर्याद दिली.
या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. दादासोा आकाराम लवटे (वय 51), लता दादासाो लवटे (वय 44) व राजश्री तुकाराम लवटे अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील संशयित आरोपी दादासाो आकाराम लवटे यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोतवाल नाईक या शिंगणापूर येथील रंजना सज्जन शेजूळ यांच्या जमिनीमध्ये शनिवारी दुपारी पीक पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. तेथील पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी दादासोा लवटे आले. त्यांनी कोतवाल नाईक यांना माझ्या शेतामध्ये ऊस पीक लावले असून त्याऐवजी द्राक्ष हे पीक पीक पाहणीमध्ये नोंद करा, असे म्हणाला. तेव्हा कोतवाल यांनी नकार दिला. कोतवाल नाईक यांनी नकार दिल्यानंतर दादासाो लवटे याने कोतवाल नाईक यांना काठी व दगडाने मारहाण केली. सरकारी दप्तर फाडून टाकले. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या शंकर साळुंखे व अशोक पोवार यांनाही लवटे याने मारहाण केली. दादासाो लवटे याची पत्नी लता, भावजय राजश्री यांनीही मारहाण केली. याप्रकरणी रात्री उशिरा जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला महसूल सेविका नाईक यांना मारहाण केल्याचा प्रकार समजताच महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी जत पोलिसात दाखल झाले होते. जत तालुका महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोळी यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच सोलापूर जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या वतीने तानाजी सोनवले यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे व घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.