Miraj News : ‘अन्‍न, औषध’चे मिरज, शिराळ्यात छापे

भेसळीच्या संशयावरून दूध, दह्याचा लाखो रुपयांचा साठा जप्त; राज्यभरात कारवाई
Food And Drug Administration
अन्‍न व औषध प्रशासन
Published on
Updated on

​सांगली/मुंबई :अन्‍न व औषध प्रशासनाने राज्यभरात दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईदरम्यान सांगली जिल्ह्यात मिरज आणि शिराळा तालुक्यात छापे टाकण्यात आले. त्यात दूध संकलन केंद्रे आणि दूध संकलन संघांमध्ये गंभीर गैरप्रकार व त्रुटी आढळल्याने दूध आणि दह्याच्‍या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

​मिरज तालुक्यातील मायाक्का दूध संकलन केंद्रावर केलेल्या कारवाईत १७८ लिटर कच्चे गायीचे दूध, ९८ लिटर कच्चे म्हशीचे दूध आणि ३८ लिटर स्किम्‍ड दूध आढळून आले. या ठिकाणी दूध संकलनाच्या आवश्यक नोंदीच उपलब्ध नसल्याचे तपासात समोर आले असून, गायीच्या दुधातील क्रीम वेगळे करून ते म्हशीच्या दुधात मिसळले जात असल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. याशिवाय, सांगलीतील फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध उत्पादक संघाच्या तपासणीत १०४ किलो संशयास्पद व अवमानक दही आढळले असून, उत्पादनाच्या लेबलवरही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.

जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात प्रशासनाने छापासत्र राबवले असून नवी मुंबई आणि पुणे जिल्ह्यातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईतील रबाळे येथील नारायण डेअरीतून १ लाख २४ हजार ३२ रुपये किमतीचे ३ हजार ६४८ लिटर दूध जप्त करून ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. तसेच, तेथील एका दूध संघात आढळलेले ८८.४ किलो क्रीम जप्त करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे मौली मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्‍टस्‌मध्ये १ लाख ३१ हजार ५६० रुपये किमतीच्या ३ हजार ३७० लिटर गायीच्या दुधाची आम्लता चाचणी केली असता, ते दोषपूर्ण आढळले. ​या संपूर्ण विशेष मोहिमेत राज्यभरातून एकूण ७ हजार ३३२ लिटर दूध, १०४ किलो दही आणि ८८.४ किलो क्रीम असा एकूण २ लाख ५५ हजार ५९२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news