

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अशा संकटाच्यावेळी स्वतःच्या जबाबदार्या बाजूला ठेवून इतरांच्या जिवाच्या सुरक्षेसाठी धाव घेणारे काही हातही आहेत. कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील रणजित शिंदे आणि त्यांचा मुलगा रोहन शिंदे हे असेच एक पिता-पुत्र.
शिंदे परिवाराचे कुची गावानजीक हॉटेल आणि ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे. रात्रपाळीत चालणार्या त्यांच्या व्यवसायामुळे महामार्गावर काय घडते, याची त्यांना सतत जाणीव असते. एखादा अपघात झाला, की या दोघांपैकी कोणी तरी त्वरित घटनास्थळी धाव घेतो. अनेकदा ते स्वतःच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात घेऊन गेले असून, वेळेवर उपचार मिळाल्याने कित्येकांचे प्राण वाचले आहेत.
अपघातानंतर अनेकजण बघ्याची भूमिका घेतात, तर काहीजण पोलिस, कोर्टाच्या गुंत्यात पडण्याच्या भीतीने मागे हटतात. मात्र शिंदे बाप-लेक हे वेळ, पैसा आणि अपवादांची चिंता न करता केवळ माणुसकीच्या भावनेने मदतीसाठी सज्ज असतात. मिरज, कवठेमहांकाळ आदी ठिकाणच्या रुग्णालयात त्यांनी रुग्णांना दाखल केले आहे. केवळ एक हॉटेल व्यावसायिक किंवा ट्रॅव्हल्स चालक म्हणून नव्हे, तर जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक जाणीव प्रेरक ठरते.