

ईश्वरपूर : घटस्फोट व पोटगीसाठी २० लाख रुपयांची मागणी करून बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुनेसह तिघांवर ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सून संजना अविनाश पवार ( वय १९), संजना हिचे वडील अविनाश ज्ञानदेव पवार ( ४५, दोघे रा. तुपारी ता. पलूस) , मावशी स्नेहल प्रवीण गलांडे (३३, रा. पलूस) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. १० दिवसापूर्वी विश्वास नाथा फाटक (६३, रा. पलूस ) यांनी सून आणि तिच्या नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी विश्वास यांचा मुलगा ऋषिकेश फाटक (३२, रा. प्रगतीनगर, पलूस) यांनी शनिवारी पोलिसांत फिर्याद दिली .
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ऋषिकेश हे शिक्षक आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे २०२४ मध्ये कर्करोगाने निधन झाले होते. त्यांना ७ वर्षांचा मुलगा आहे. ऋषिकेश यांनी २५ जानेवारी २०२६ रोजी संजना हिच्याशी दुसरा विवाह केला. लग्नानंतर काही दिवसांतच संजना हिचे वडील अविनाश हे ऋषिकेश यांच्या घरी गेले. "मुलीला नांदवायचे असेल तर १५ लाख रुपये द्यावे लागतील," असे म्हणून शिवीगाळ करत मुलीला घेऊन गेले. त्यानंतर संजना हिचा पहिला विवाह झालेला आहे, तिचा घटस्फोट झालेला नाही, ही बाब ऋषिकेश यांच्या निदर्शनास आली.
त्यानंतर संशयित संजना, वडील अविनाश, मावशी स्नेहल हे सतत ऋषिकेश व त्यांच्या कुटुंबाकडे लग्नाचा खर्च, पोटगी आणि पुढील पालनपोषणासाठी २० लाख रुपये द्यावेत यासाठी तगादा लावत होते. अन्यथा कौटुंबिक हिंसाचार व विश्वास यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी संशयितांकडून सतत दिली जात होती.
शेतात जाऊन तणनाशक पिले...
संशयितांच्या त्रासामुळे फाटक कुटुंब मानसिक तणावात होते. विश्वास हे २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील त्यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी तणनाशक प्यायले. त्यांना सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २२ ऑक्टोबर रोजी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी (३१ ऑक्टोबर ) रोजी ऋषिकेश यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.