

संदीप पाटील
कडेगाव : कडेगाव तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत चालूवर्षी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याने उसासाठी कारखान्यांमध्ये पळवा-पळवी सुरू झाली आहे.
दरवर्षीच्या तुलनेत कारखान्यांची वाढती संख्या व उसाचे घटते क्षेत्र यामुळे चालू ऊस हंगाम फेब्रुवारीअखेरपर्यंत गुंडाळण्याची शक्यता आहे. सद्यपरिस्थितीत शेतकरीही चांगला दर देण्याऱ्या कारखान्यालाच ऊस देणार असल्याचे बोलत आहेत.
जिल्ह्यातील काही कारखान्यांनी 3500, तर काही कारखान्यांनी 3300 रुपये दर जाहीर केला आहे. त्यामुळे यापेक्षाही कोणी वाढीव दर देते का? या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. त्यामुळे कारखानदारांत उसासाठी पळवा -पळवी सुरू केली आहे. पाणी योजनांमुळे परिसरात ऊस लागवड जोमाने झाली असली तरी, महागडी खते, कीटकनाशके, मजूर, ऊस दर यामुळे सध्या बहुतांश शेतकरी ऊस शेतीकडे कानाडोळा करू लागले आहेत. शेतकरी ऊस शेतीबरोबर शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. भाजीपाला पिकाबरोबरच आलेशेती सुरू झाली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापूर्वी आल्याला चांगला दर मिळाल्याने कडेगाव तालुक्यात आले लागवढीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आले दरात सातत्याने मोठी घसरण होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी आलेशेतीकडे कानाडोळा केला होता. परिणामी कडेगाव तालुक्यात आल्याचे उत्पादन कमी झाले होते. परंतु गेल्या वर्षभरापासून आल्याला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकरी पुन्हा आलेशेतीकडे वळला आहे. या वाढत्या दराने आले उत्पादक शेतकऱ्यांत सध्या आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सध्या आले हे पीक शेतकऱ्यांना हमखास पैसे मिळवून देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांचा वाढता कल आले लागवडीकडे आहे. परिणामी ऊस क्षेत्रात मोठी घट झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे कारखान्यांत उसासाठी पळवा-पळवी सुरू झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.