देवराष्ट्रे : जिल्ह्यात ऊस, द्राक्ष, केळी, हळद यासह भाजीपाल्याच्या लागवडीचे क्षेत्र मोठे असतानाच, यामध्ये विदेशी भाज्यांच्या लागवडीकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. कमी कालावधीत, कमी खर्चात चांगला नफा मिळत असल्याने जिल्ह्यातील तरुण शेतकरी या पिकांकडे वळला आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी भागात ताकारी, टेंभू, आरफळ आणि म्हैसाळ योजनेचे पाणी फिरल्याने बारमाही शेतीत मोठी वाढ झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसायांची भरभराट झाल्याने शेतकर्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. याबरोबरच सहकारी साखर कारखान्यांसह खासगी साखर कारखान्यांचे जाळे निर्माण झाल्याने आणि उसाला चांगला दर मिळत असल्याने उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.
सध्या जिल्ह्यात ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब, आले, हळद यासह भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. द्राक्ष, केळी, डाळिंब यांची विदेशात मोठी निर्यातही होत आहे. यातून शेतकर्यांना चांगला आर्थिक फायदाही होत आहे. त्यामुळे शेतकरी दर्जेदार माल तयार करण्यावर भर देत आहेत. आता यामध्येही बदल होत काही प्रयोगशील शेतकरी विदेशी भाज्या घेत आहेत. जिल्ह्यातील प्रामुख्याने कडेगाव, खानापूर, वाळवा, पलूस, तासगाव
तालुक्यात विदेशी भाज्या लागवडीकडे तरुण शेतकर्यांचा जास्त ओढा आहे. कमी कालावधीत, कमी खर्चात चांगला नफा मिळत असल्याने आणि वर्षभर या भाज्यांना चांगली मागणी व हुकमी बाजारपेठ असल्याने शेतकरी या पिकांकडे आकर्षित होत आहेत. विदेशी भाज्यांमध्ये प्रामुख्याने झुकेनी, रेड कॅब्बी, सॅलरी, स्वीट पेपर रेड, स्वीट पेपर यलो, चेरी टोमॅटो, ब्रोकोली, लीक, पार्सेली, लाल काकडी, चायोटे यासारख्या भाज्यांची लागवड करण्यात येत आहे.
साधारण या भाज्यांची लागवड झाल्यापासून तीस ते चाळीस दिवसात उत्पादन सुरू होते. शिवाय या भाज्यांच्या उत्पादनासाठी शेतकर्यांना अतिशय कमी खर्च येतो. शिवाय मुंबई, पुणे, बेंगलोर येथे व्यापार्यांकडून मोठी मागणी असल्याने माल विकण्यासाठी शेतकर्यांना जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस विदेशी भाज्यांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत चालले आहे. तरुण शेतकर्यांचा विदेशी भाज्या लागवडीकडे कल वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.