

कासेगाव : गावा-गावातील सेवा सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देण्याचे काम केले आहे. प्रत्येक सोसायटीने नवनवीन व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. यामुळे सभासदांना त्याचा लाभ मिळेल व संस्थाही पुढे जाईल, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले.
सुरूल (ता. वाळवा) येथे सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक होते. जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, रेठरे धरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील, संचालक नामदेव मोहिते, संचालक विनायक कदम, प्रशांत थोरात उपस्थित होते. सोसायटीचे अध्यक्ष संदेश पाटील यांनी स्वागत केले.
जयंत पाटील म्हणाले, 109 वर्षे पूर्ण झालेल्या सोसायटीमध्ये अध्यक्ष संदेश पाटील व त्यांच्या संचालक मंडळांने देखणी सर्वसोयीनीयुक्त अशी इमारत बांधली आहे. जे. वाय.पाटील यांनी राजारामबापूंना साथ देत आतापर्यंत आमच्यासोबत सर्वांना बरोबर घेऊन काम केले आहे. इथून पुढेही गावाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत साथ द्यावी, असे आवाहन केले.
मानसिंगराव नाईक म्हणाले, जे. वाय. पाटील यांच्यानंतर गावातील संस्था उत्तमप्रकारे चालल्या असून संदेश पाटील यांनी उत्कृष्ट इमारत बांधून गावा-गावातील सोसायट्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. सुरूल सेवा सोसायटीने तीन कोटीची उलाढाल केली आहे.
देवराज पाटील म्हणाले, सरकारने लाडक्या बहिणींना सरसकट अनुदान दिले नाही.याप्रसंगी बंडोपंत नांगरे, सोसायटी उपाध्यक्षा मनीषा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच शंकर चव्हाण यांनी आभार मानले. सचिव सुभाष जाधव यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन विजय लोहार यांनी केले. याप्रसंगी ठेकेदार बशीर मगदूम यांचा पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुस्मिता जाधव, मंजुषा पाटील, मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक सुधीर काटे, प्रशांत पाटील, प्रकाश पाटील, उपसरपंच धनाजी इंगळे, रेश्मा गुरव, शारदा पाटील आदी उपस्थित होते.