सांगली : विकास सेवा सोसायटीतील सभासद शेतकर्याचा अपघाती मृत्यू झाल्यास विमा कंपनीवर अवलंबून न राहता बँकेच्या नफ्यातून थेट २ लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. तसेच शेतकर्यांसाठी एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजना सुरूच राहील आणि बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त सभासद संस्थांना १५ टक्के लाभांश दिला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
येथील धनंजय गार्डनमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी नाईक यांनी बँकेच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. यावेळी माजी मंत्री आमदार जयंत पाटील, बँकेच्या उपाध्यक्षm जयश्री पाटील, संचालक आमदार सत्यजित देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, महेंद्र लाड, प्रकाश जमदाडे, तानाजी पाटील, सुरेश पाटील, अमोल बाबर, वैभव शिंदे, राहुल महाडिक, बी. एस. पाटील, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, मन्सूर खतीब, रामचंद्र सरगर, अनिता सगरे, माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, गणेश गाडगीळ, किरण लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते.
नाईक म्हणाले, विकास सेवा सोसायटीतील सभासद शेतकर्याचा अपघाती मृत्यू झाल्यास बँकेच्या नफ्यातून मदत दिली जाईल. यापूर्वी विमा कंपनीला ३.२५ कोटी रुपये हप्ता भरून १६५ मृत शेतकर्यांच्या वारसांना २.६५ कोटी रुपयेच मिळाले होते. त्यामुळे ही योजना आता थेट बँकेमार्फत चालवली जाईल. शतकमहोत्सवी वर्षानिमित्त सभासद संस्थांना १२ टक्केऐवजी १५ टक्के लाभांश जमा केला जाईल. शेतकरी व सभासदांसाठी रिझर्व्ह बँकेच्या धोरणाप्रमाणे सवलती देणारी ओटीएस योजना पुढेही सुरू राहील. शेतकर्यांच्या मागणीनुसार गृहकर्जाच्या व्याजदरात १ टक्का कपात केली जाईल. सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी १० हजार रुपये देण्याच्या योजनेला सहकार विभागाची मान्यता मिळवण्यासाठी पुन्हा ठराव केला जाईल. तसेच वर्ग २ च्या जमिनींवर पीककर्ज देण्याबाबत अन्य मालमत्ता तारण घेऊन विचार केला जाईल.
बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून ठेवींनी १० हजार कोटींचा टप्पा पार केला आहे, तर ८ हजार कोटींचे कर्जवाटप झाले आहे. बँकेला २०८ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून नेट एनपीए शून्य, तर ग्रॉस एनपीए ६.५ टक्के आहे. येत्या वर्षात ग्रॉस एनपीए ५ टक्क्यांच्या आत आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वसाधारण सभेत बँकेच्या पारदर्शी कारभाराबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. चर्चेत तानाजी पाटील (बोरगाव), महावीर पाटील, शशिकांत शेळके यांसह इतर सभासदांनी मनोगत व्यक्त केले. सभेच्या प्रारंभी संचालक प्रकाश जमदाडे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.