

आष्टा : भडकंबे (ता. वाळवा) येथील शेतकऱ्याचे अपहरण करून, त्याच्या मालकीच्या शेतजमिनीचा खोटा दस्त तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूर्यकांत भीमराव मोरे (वय 49, रा. भडकंबे, ता. वाळवा) असे अपहरण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे, तर पांडुरंग कुंडलिक मोरे (रा. भडकंबे), नंदा संजय शिंगटे, संभाजी बाळासाहेब मोरबाळे, विश्वास पांडुरंग बेनाडे, हर्षवर्धन दिनकर खोत, आनंदा शामराव बेनाडे (सर्व रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सूर्यकांत भीमराव मोरे हे पत्नीच्या मृत्यूनंतर भडकंबे येथे एकटे राहतात. दि. 19 मार्चरोजी पांडुरंग कुंडलिक मोरे यांनी त्यांचे घरातून अपहरण करून त्यांना गोटखिंडी येथे आपली मुलगी सानिका अमृत शिंगे यांच्या घरी एका खोलीत डांबून ठेवले.
त्यानंतर दि. 20 मार्च 2025 रोजी पांडुरंग मोरे, नंदा शिंगटे, संभाजी मोरबाळे, विश्वास बेनाडे, हर्षवर्धन खोत, आनंदा बेनाडे या सर्व संशयितांनी संगनमत करून त्यांना जबरदस्तीने आष्टा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आणले. तिथे दस्त वाचून न दाखवता, मोबदला रक्कम न देता आणि सूर्यकांत मोरे यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेत खोटा खरेदी दस्त (क्र. 765/2025) तयार केला. या दस्तामध्ये फिर्यादींच्या गट क्र. 268 मधील 0.38.85 हेक्टर वडिलोपार्जित बागायती शेतजमिनीचा व्यवहार 9 लाख 10 हजार रुपयांना केल्याचे दाखविण्यात आले आहे, जी जमीन 10 लाखांहूनही अधिक किमतीची आहे.
दरम्यान, सूर्यकांत मोरे यांची मुलगी शीतल हिने दि. 21 मार्च 2025 रोजी आष्टा पोलिस ठाण्यात वडील हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दि. 22 मार्च 2025 रोजी पांडुरंग मोरे यांनी त्यांना आष्टा पोलिस ठाण्यात हजर केले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अपहरण आणि फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी वरील सर्व संशयितांवर अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टा पोलिस अधिक तपास करीत आहेत.