

देशिंग : देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील तिरमलवाडी वस्तीवरील शाळेच्या आवारातील मोठा वटवृक्ष वादळी वार्यामुळे कोसळला. ज्या वडाला आयाबाया पूजत होत्या, पक्षी विसावा घेत होते, तो इतिहासाचा साक्षीदार असलेला हा वड कोसळला.
पण गावातील अक्षय गुरव आणि त्याच्या मित्रांनी या वडाचे पुनर्रोपण करण्याचे ठरवले. त्यांनी अग्रणी पाणी फाऊंडेशनचे कार्यकर्ते शिवदास भोसले यांच्याशी संपर्क केला. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी दोन मोठ्या क्रेनच्या साहाय्याने हे झाड बाजूला केले. जेसीबीच्या साहाय्याने मोठा खड्डा काढला. फांद्या छाटून जवळच्याच परिसरात वडाचे पुनर्रोपण केले. यावेळी तिरमलवाडी शाळेतील विद्यार्थांनी वृक्ष जतन करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. देशिंगचे सरपंच प्रवीण पवार, उपसरपंच रावसाहेब सदामते, संदीप माने, अजित वांडरे, सुखदेव गुरव, मनोज गुरव व मित्रमंडळ यांनीही सहकार्य केले.