

सांगली : 11 डिसेंबर 1967. कोयना भूकंप. उभा महाराष्ट्र पहाटे भूकंपानं हादरला. 7.5 रिश्टर स्केलच्या या भूकंपानं गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली. घरं पत्त्यासारखी कोसळली. शंभरावर माणसांचे आणि हजारावर जनावरांचे बळी गेले. कित्येक माणसं कायमची जायबंदी झाली, दिव्यांग झाली. या भूकंपानं जमीनच नाही, तर शासनही हादरलं. कोसळलेली घरं, भेगा पडलेल्या जमिनी पुन्हा धड झाल्या, पण घाबरलेली मनं पुढं कित्येक दिवस-रात्री थार्यावर आली नाहीत. आज 57 वर्षांनंतरही त्या पहाटेच्या आठवणींचा धसका त्यांच्या मनात तसाच आहे.
11 डिसेंबर 1967 रोजी जोरदार भूकंपानं महाराष्ट्र हादरला. भूकंपाचा केंद्रबिंदू होता कोयना धरणाजवळ. या भागाला भूकंपाचं काही कवतिक नव्हतंच, पण या पहाटेचा हा भूकंप होता तब्बल 7.5 रिश्टर स्केलचा. पाटण तालुक्यातील कोयना परिसरासह चिपळूण, खेड, संगमेश्वर, देवरुख भाग हादरला. पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी झालेल्या या शक्तिशाली भूकंपामुळं पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील सुमारे पाचशे गावं, छोटी शहरं उद्ध्वस्त झाली. कोयना परिसरातील 60 गावांमधील 185 जणांचा बळी गेला. दोन हजार लोक जबर जखमी झाले. 40 हजारांवर घरं धडाधड कोसळली. संसार नुसते कोसळले नाहीत, तर घराखाली दबून माणसंही मेली. हजारावर जनावरं दगावली. मोठ्या धरणांबाबत वाद सुरू झाले. घटना घडून 57 वर्षे झाली, पण आजही जुन्या पिढीच्या मनात या भूकंपाच्या जखमा ताज्या आहेत.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर आलेली ही सगळ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती. या भूकंपानंतर सार्या पाटण तालुक्याची भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून शासनदरबारी नोंद झाली. भूकंपबाधितांसाठी शासनानं स्वतंत्र विभाग सुरू केला. सातारा, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यांतील काही गावांना कायमची गावं सोडावी लागली. या गावांचं पुनर्वसन आणि पायाभूत सुविधांसाठी कोयना भूकंप निधीची तरतूद करण्यात आली. आज इतक्या वर्षांनंतरही ही विस्थापित गावं आणि त्या गावांत राहणार्या माणसांची स्थिती बघायला शासनाला सवडही नाही. त्यांच्या कपाळावरील भूकंपग्रस्त नावाचा शिक्का पिढ्यान् पिढ्या तसाच आहे. शासनदरबारी त्यांची फरफट सुरूच आहे. भूकंपापेक्षा शासनानं दिलेले अन्यायाचे हादरे त्यांच्यासाठी त्रासदायक आहेत.
बलवडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार म्हणाले, सांगलीत भरणारं काँग्रेसचं अधिवेशन उधळून लावण्यासाठी आदल्या दिवशीच आम्ही टिळक चौकात जोरदार आंदोलन केलं आणि पोलिसांनी आम्हाला तुरुंगात टाकलं. पहाटे सारा तुरुंग हलायला लागला. भूकंपाचं हे रौद्ररूप भीतीदायक होतं. सारा कोयना परिसर आणि कोकण उद्ध्वस्त झाल्याचं समजत होतं. मंत्री बाळासाहेब देसाई यांनी या आपत्तीत खूप चांगलं काम केलं. पण लोक आता भूकंपग्रस्तांच्या वेदना आणि देसाई दोघांनाही विसरलेत.
सांगलीतील इंजि. बी. डी. चौगुले म्हणाले, मी कोयना प्रकल्पात ज्युनियर इंजिनिअर होतो. तिथून गिरणा आणि नंतर चणकापूर डॅमवर बदली झाली. चणकापूरला असताना पहाटे सारं हादरायला लागलं. शिपाई जीव वाचवण्यासाठी धावत होता. सारी जमीन हादरत होती. प्रचंड मोठा हा भूकंप होता. त्यानंतर आम्ही कोयना धरण परिसरात गेलो, तर सारे क्वार्टर्स उद्ध्वस्त झाले होते. काही दोस्त दगावले होते, तर बरेच जखमी झाले होते. आजही या आठवणी काटा आणतात.
तारुख (ता. कराड) येथील काका पुजारी म्हणाले, पहाटे खूप मोठा आवाज झाला. परिसरातील घरं हलायला लागली. लोडबेअरिंगच्या इमारती आमच्या डोळ्यासमोर कोसळत होत्या. वीज गायब झाली. माणसं घर, गाव सोडून रानात, माळावर जाऊन बसली होती. बरेच लोक कोयना धरणच फुटलं, असं समजून डोंगरावर पळत होते. बाळासाहेब देसाई यांच्यासह नेतेमंडळी रस्त्यावर उतरून लोकांना आवाहन करत होते. त्यानंतर महिनाभर कोणीही घरात झोपत नव्हतं.