

सांगली : चार महिन्यांपूर्वी शिवाजी मंडईत भाजी खरेदीसाठी आलेले एक ज्येष्ठ नागरिक बसच्या खाली सापडले. त्यांच्या दोन्ही पायांवरून बसचे चाक गेले. ते रुग्णालयात आठ-दहा दिवस होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. शिवाजी मंडईबाहेर घडलेली ही घटना.
शिवाजी मंडईबाहेर सकाळी जा, कोपर्याजवळ भाजीवाले, फळवाले यांनी रस्त्यावरच ठाण मांडलेले असते. त्यांच्याकडे येणारे ग्राहक आपली दुचाकी, चारचाकी रस्त्यावरच पार्क करतात. तेथूनच बसेस तसेच अन्य अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. उरलेल्या रस्त्यावरून कशीबशी वाहने हाकावी लागतात. ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यामुळे सांगली-मिरज-कुपवाड या जागतिक दर्जाच्या महानगरपालिकेला जाग आली. याचा अर्थ स्वच्छ आहे, की ती नेहमीच गाढ झोपेत असते. माणसाचा मृत्यू झाल्यामुळे या महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला फार्स करण्याची संधी मिळाली. दोन दिवस भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांना रस्त्यावरून हटवले. झाले... पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. कधीतरी भीषण अपघात होण्याची शक्यता कशी नाकारायची ?
झुलेलाल चौक ते सिव्हिल हॉस्पिटल, पुढे अगदी त्रिकोणी बागेपर्यर्ंत या रस्त्यावर वाहतूक प्रचंड. या रस्त्यावर अवजड वाहनेही धावतात बेफाम. या रस्त्यावर एक तरी गतिरोधक दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी स्पर्धा महानगरपालिकेने घ्यायला हरकत नाही. आधीच अतिक्रमणांचा फास, टोलेजंग इमारतींचे पार्किंग कागदावरच आणि वाहनांचा महापूर रस्त्यावर. याच रस्त्यावर गुरुवारी एक कॉलेज युवती जागीच ठार झाली.
झाले... भ्रष्टाचाराची बजबजपुरी झालेल्या महानगरपालिकेतील अतिक्रमण निर्मूलन पथकाने पुन्हा फार्स केला. त्यांची एक अतिक्रमण निर्मूलन गाडी शुक्रवारी आली. या गाडीत अधिकारी काही नव्हता. केवळ चार कर्मचारी. त्यांनी काही गाडेवाल्यांना परवाना विचारला, झाले... गाडी गेली पुढे. एक गाडा, चार स्टूल आणि दोन फलक उचलून नेले. अतिक्रमण निर्मूलन मोहीम फत्ते. रंगला कागद. गोरगरिबांची गाडी उचलायची, बड्या मछलींना हात लावायची हिंमत नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात गुरुवारी सायंकाळी झालेले नाटक. नाटकाचे नाव... कथित सामाजिक कार्यकर्त्यांची दमबाजी. तेथे अतिक्रमण निर्मूलन पथक गेलेले. लगेचच तीन-चार कार्यकर्ते जमले. सात-आठ विक्रेते. ही झाली पात्रे. फेरीवाला धोरण न राबवता तुम्हाला कारवाईचा अधिकार दिलाच कोणी? अशी संवादफेक झाली. मग काय? कचकच जरा वाढली. उपायुक्त आल्या, त्यांनी पुनर्वसनाचे आश्वासन दिले. दिले म्हणजे, तशी ग्वाही देण्यास भाग पाडले. नाटकावर पडदा पडला. समाजमाध्यमात एकतेचा झेंडा फडकविणारी भाषा रंगली. अतिक्रमणाचा विजय असो...
सांगलीतील कोणत्याही रस्त्यावरून जा, भेटेल अतिक्रमणांचा विळखा. इमारतींची अतिक्रमणे, त्यानंतर हातगाडे, भाजी-फळे आदी विक्रेते, त्यानंतर पार्किंग. पार्किंगचे तर तांडवनृत्यच. लावा कुठेही गाडी, रस्ता आमच्या बापाचाच. भीती सोडाच, यंत्रणांचा साधा धाकही उरलेला नाही.
सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हातगाड्यांना व्यवसाय करण्यास परवानगी असते. त्यांनी संबंधित जागेवर कायमस्वरूपी काहीही करावयाचे नसते. खुर्च्या, स्टूल ठेेवणे, ताडपत्री टाकणे, शेड मारणे असले काहीही उद्योग करावयाचे नसतात, पण हे झाले कागदावर. प्रत्यक्षात हे सारे केलेले असते.
वाहतूक पोलिसांविषयी समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. ते मोक्याच्या ठिकाणीच का उभे राहतात? ते कसला मलिदा गोळा करतात? त्यांना पांढरा बगळा म्हणणे चुकीचेच आहे, पण ते सावज शोधत असतात का? वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा दंड वसूल करा, कागदपत्रे दाखव म्हणून छळा... ही यांची कामे आहेत का? बाहेरची गाडी आली रे आली, की ती अडवलीच जाते, त्याच्याकडून प्रसाद खाल्ला जातो, मगच सोडतात. लोक हे उघड-उघड का बोलतात? वसंत बंगला, मार्केट यार्ड, टिंबर एरिया, कर्नाळ रोड, लक्ष्मी मंदिर चौक, मिशन चौक यांसारख्या मोक्याच्या जागेवर थांबून हे करतात काय? एखाद्या शासकीय कार्यालयात आयुष्याची चांदी करणारे टेबल असते, तशा या जागा आहेत. वाहतूक पोलिस या शब्दयोजनेऐवजी टपलेले छायाचित्रकार म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.