

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या गार्डी (ता. खानापूर) येथील शाखेत शासकीय अनुदान व व्याजामध्ये तब्बल 30 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शाखाधिकारी रघुनाथ धोंडिराम यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. या अपहारात शाखेतीलच सेवानिवृत्त कर्मचारी धनराज रामचंद्र निकम याचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या दोघांची वरिष्ठ अधिकार्यांमार्फत चौकशी सुरु असून त्याचा अहवाल आल्यानंतर दोघांवरही फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.
जिल्हा बॅँकेत शेतकर्यांसाठी शासनाकडून जमा झालेल्या शासकीय अनुदानात घोटाळा झाल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उघड होत आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षांतील हे घोटाळे आहेत. शासनाचे व बॅँकेचे अधिकारी संयुक्तपणे सर्व शाखांची तपासणी करत आहेत. त्यात हे घोटाळ्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. अतिवृष्टी, दुष्काळ व अन्य नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी शासनाने दिलेले मदत, अनुदान संबधित शेतकर्यांच्या जिल्हा बॅँकेतील खात्यावर जमा झालेले असते. काही शेतकर्यांची तांत्रिक कारणांमुळे तसेच बॅँक खाते नसणे व अन्य कारणांमुळे ही मदत बॅँकेतच पडून राहते. अशा रकमेवर कर्मचार्यांनी संगनमताने डल्ला मारल्याचे उघड होत आहे. याबरोबरच अनेक ठिकाणी बॅँकेच्या कर्मचार्यांनी देणे-व्याज रकमेत घोटाळा करून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे.
गार्डी (ता. खानापूर) शाखेत शासकीय अनुदान व व्याज रकमेत तब्बल 30 लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. शाखाधिकारी रघुनाथ धोंडिराम यादव व या शाखेतील सेवानिवृत्त शाखाधिकारी धनराज रामचंद्र निकम याने संगनमताने हा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. निकम हा दोन वर्षापूर्वी निवृत्त झाला आहे. निकम शाखाधिकारी म्हणून कार्यरत असताना यादव लिपीक म्हणून काम करत होता. या दोघांनी शासकीय अनुदान व बॅँक व्याजाच्या रकमेत अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. शाखाधिकारी यादव याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांकडून चौकशी सुरु असून याचा अहवाल आल्यानंतर दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
घोटाळेबाज निवृत्त कर्मचार्याच्या ठेवी गोठवल्याजिल्हा बॅँकेच्या गार्डी शाखेत सुमारे 30 लाखांचा अपहार झाला आहे. शाखाधिकारी रघुनाथ यादव यांना निलंबित केले आहे, तर सेवानिवृत्त कर्मचारी धनराज रामचंद्र निकम याच्या बॅँकेतील सुमारे चाळीस लाखांच्या ठेवी गोठवल्या आहेत. या दोघांकडूनही अपहारातील रक्कम वसूल करण्यात येणार आहे. तसेच अंतिम चौकशीनंतर दोघांवर फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.